‘& जरा हटके’मध्ये हटके भूमिका
रंगभूमीवर वेगवेगळ्या स्पर्धांमधून आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारी गुणी कलाकार शिवानी रांगोळे ‘& जरा हटके’ या चित्रपटात आस्था नावाची हटके भूमिका साकारत आहे. हा सिनेमा २२ जुलैला प्रदर्शित होणार असून, त्यात शिवानी रसिकांचे लक्ष वेधून घेणार आहे.
‘आस्था’ या १७ वर्षाच्या मुलीची भूमिका आहे. ती पॉजिटीव्ह, समजूतदार पण वयाबरोबरच खेळकर आहे. या भूमिकेबद्दल शिवानीला देखील खूप उत्सुकता आहे.किशोर वयीन मुलीची मानसिकता आणि भावना अगदी तत्परतेने तिने या चित्रपटातून मांडली आहे.
आस्था आधुनिक विचारांची आणि स्वच्छंद आयुष्य जगणारी आहे. तिला स्वतःचे विचार आणि स्वातंत्र्य आहे, त्यामुळे आपल्या आईच्या पुनर्विवाह करण्याच्या निर्णयावर तिच्या नजरेतून बदलत जाणारी मानसिकता, तसेच एका बाजूला आईच्या लग्नासाठी खुश असतानाच दुसरीकडे वडिलांच्या जागेवर कोणा दुसऱ्याला पाहताना तिला होणारा त्रास याची भावनिक गुंतागुंत तिने छान विणली आहे. कालानुरूप बदलत जाणाऱ्या नात्यांच्या समीकरणात अडकलेल्या ‘आस्था’ या व्यक्तिरेखाला योग्य न्याय देण्याचे मोठे आव्हान शिवानीने आपल्या अभिनयाच्या बळावर लीलया पेलले आहे.
‘& जरा हटके’मधील तिने साकारलेली ‘आस्था’ तिच्या अभिनय कारकिर्दीला एक नवा आयाम देणारी ठरणार आहे. मुळात आंतरमहाविद्यालयीन नाट्य आणि एकांकिका स्पर्धेतून अभिनयाचे धडे गिरवणारी शिवानी यापूर्वी अनेक छोट्यामोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे.
अनेक नाट्यस्पर्धेतून स्वतःला सिद्ध करणाऱ्या शिवानीने सर्वप्रथम ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती. त्यानंतर अंकुश चौधरी व मुक्ता बर्वे अभिनित ‘डबल सीट’ या चित्रपटातही ती छोट्या भूमिकेत दिसून आली. शिवाय सुजय डहाके याच्या ‘फ़ुंतरु’मधील भूमिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.. मात्र, आता प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी ‘& जरा हटके’ चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
मिताली जोशी लिखित या चित्रपटातला ‘&’ इतरांहून जरा हटकेच असल्यामुळे ‘& जरा हटके’ हा चित्रपट कुतूहलाचा विषय ठरत आहे. शिवानी रांगोळेसोबत मृणाल कुलकर्णी, बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ मेनन हे कलाकारही आपल्याला या सिनेमात वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. इरॉस इंटरनॅशनलच्या क्रीशिका लुल्ला प्रस्तुत आणि दिग्दर्शक रवी जाधव निर्मित ‘& जरा हटके’ या चित्रपटाची सिनेरसिकांना उत्सुकता लागली आहे.