नवी नाट्यकृती लवकरच येणार रंगमंचावर
सुनील बर्वे यांच्या ‘सुबक’ची अमर फोटो स्टुडीओ ही नवीकोरी हटके कलाकृती लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीस येत आहे. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे, सिद्धेश पूरकर ही लोकप्रिय कलाकार मंडळी यात एकत्र आली आहेत. मनस्विनी लता रवींद्र यांचे लेखन असणाऱ्या ‘अमर फोटो स्टुडीओ’ या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी करीत आहेत.
अभिनेता सुनील बर्वे यांनी चार वर्षांपूर्वी ‘हर्बेरिअम’ हा आगळावेगळा उपक्रम सुरु केला. अभिनेता सुनील बर्वे यांच्या ‘सुबक’ची निर्मिती असलेल्या या उपक्रमाला नाटय रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यात ‘सुर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आंधळं दळंतय’ व ‘झोपी गेलेला जागा झाला’ या पाच जुन्या गाजलेल्या नाटकांचे नव्या संचात सादरीकरण करून नाटय रसिकांना एक अनोखी पर्वणी दिली. आता याच शिदोरीवर ‘सुबक’ची अमर फोटो स्टुडीओ ही हटके कलाकृती घेऊन सुनील बर्वे सज्ज झाले आहेत. या नाटकाचा विषय अजून गुलदस्त्यात असून रसिक प्रेक्षकांसाठी नक्कीच ती एक अफलातून ट्रीट असणार आहे.
चेतन डांगे लिखित यातील गीतांना गंधार संगोराम यांचे पार्श्वसंगीत असणार आहे. या नाटकाची संकल्पना घेऊन अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले हे कलाकार सुनील बर्वे यांच्याकडे गेले त्यांनाही हा विषय आवडला आणि तरुणाईला प्रोत्साहन द्यावं या निर्मळ हेतूने सुनील बर्वे यांनी या कलाकृतीला पाठिंबा दिल्याचे मनोगत व्यक्त केले. ‘हर्बेरिअम’ हा उपक्रम पुढे करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘अमर फोटो स्टुडीओ’ नाटकाच्या तालमी सध्या जोरात सुरु असून लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.