वीर पत्नी स्वाती अजय गावंड यांचा सहभाग
गेले दशकभर महाराष्ट्राच्या कानाकोप-यात असंख्य गृहलक्ष्मींच्या स्वप्नांना आकार देणा-या झी मराठीवरील आदेश बांदेकर यांच्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचा येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे सोमवारी २६ जानेवारीला प्रसारित होणारा विशेष भाग या कार्यक्रमाच्या इतिहासातला अमूल्य आठवणीचा वेगळा भाग ठरणार आहे.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या लष्करी तसेच पोलीस सेवेतल्या वीरांप्रती आदरभाव व्यक्त केला जातो. तीच परंपरा यंदाच्या २६ जानेवारीच्या भागात अनुसरून मुंबईत डोंगरी इथे चोराला पकडताना प्राण गमवावा लागलेले शहीद पोलिस कॉन्स्टेबल अजय गावंड यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. या भागात आदेश बांदेकर यांनी शहीद पोलिस कॉन्स्टेबल अजय गावंड यांच्या पत्नी स्वाती अजय गावंड यांना सहभागी केले असून स्वाती वहिनींच्या विशेष सहभागाने ‘होम मिनिस्टर’चा हा भाग संस्मरणीय झाला आहे.
प्रेम, माया, जिव्हाळा, आनंद अशा विविध भावनांची गुंफण करणारा आणि स्त्रीचा तसंच स्त्रीत्वाचा गौरव करणारा अशी या कार्यक्रमाची ओळख अधिक दृढ करणारा आणि हळव्या आठवणीचा हा विशेष भाग आजवरचा सर्वाधिक भावविवश करणारा भाग आहे, आपल्या पतीच्या धाडसी कामगिरीचा विलक्षण अभिमान असलेल्या वीरपत्नीचा या कार्यक्रमातला सहभाग, त्या शहीद पोलिस कुटुंबाशी साधलेला संवाद हे सगळेच शब्दातीत असल्याचे आदेश बांदेकर यांनी म्हटले आहे.या भागात स्वाती वहिनींना मराठी संस्कृतीचा मानबिंदू आणि महाराष्ट्राचे महावस्त्र असलेली पैठणी तसेच ५१,००० रुपये रोख देण्यात आले. ‘होम मिनिस्टर’चा हा विशेष भाग येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.