लवकरच येणार रसिकांच्या भेटीला
निर्माते-दिग्दर्शक मुनावर भगत यांच्या आगामी ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटात तब्बल सहा गाण्यांचा साजशृंगार केला असून, ‘मीना शमीम फिल्म्स’च्या बेनरखाली तयार झालेला हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. अलीकडेच ‘निवडुंग’चा संगीत प्रकाशन सोहळा जुहू येथील सी साईड या हॉटेलमध्ये मोठया दिमाखात पार पडला.
या सोहळ्याला निर्माते-दिग्दर्शक मुनावर भगत, संगीतकार रफिक शेख, चित्रपटातील कलाकार भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, शेखर फडके, सहदिग्दर्शक शशिकांत मिना, केमेरामन एकेन. सेबास्टेन, झी म्युझिकचे मोहित पोतदार, वितरक गिरीश वानखेडे यांच्यासह मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवर मंडळी उपस्थित होती.
‘निवडुंग’ या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. या सहाही गीतरचना चित्रपटाच्या कथेशी एकरूप होणाऱ्या असून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आहेत. वेगवेगळया मूडमधील या सहाही गीतरचनांना संगीतकार रफीक शेख यांनी स्वरसाज चढवला आहे.
या चित्रपटातील ‘विठ्ठला, विठ्ठला…’ हे भक्तीपूर्ण गीत झहीर कलाम यांनी लिहिलं असून स्वप्नील बांदोडकरने गायलं आहे. ‘माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा…’ ही या चित्रपटातील झहीर कलाम यांची लावणी उर्मिला धनगरच्या भारदस्त आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आली आहेत. प्रसाद कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘माझे मला कळेना…’ डॉ. नेहा राजपाल आणि रफीक शेख यांनी गायलं आहे. कवी शरद यांच्या लेखणीतून अवतरलेली ‘तिला मी पाहिले…’ ही गजलही डॉ. नेहा राजपाल आणि रफीक यांनी गायली आहे. याशिवाय रफिक यांनी सुरेश वाडकर यांच्या सोबत गीतकार कलाम यांच्या लेखणीतून साकारलेले कुबेराच्या घरात…’ हे गीतही गायलं आहे. ‘‘धोंडी धोंडी पानी दे…’’ या कलाम यांनी लिहिलेल्या गीतालाही रफीक शेख यांनीच स्वर दिला आहे.
महाराष्ट्रात सध्या भेडसावत असलेली सर्वात भीषण समस्या म्हणजे दुष्काळ. आपल्याकडे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यावर पैसे मिळतात, पण जिवंतपणी पैशाअभावी जीव देण्याची पाळी येते. नेमक्या याच प्रश्नावर भाष्य करणारा ‘निवडुंग’ हा सिनेमा आहे. सामाजिक आशय असलेल्या या चित्रपटात एका वेगळया प्रकारची प्रेमकथाही पाहायला मिळेल.
मराठीत पदार्पण करताना मुनावर भगत यांनी दुष्काळासारखा महत्त्वाचा विषय हाताळला आहे. या विषयाला गीत संगीताची उचीत जोड देत तो मनोरंजनदृष्ट्या परिपूर्ण बनवला आहे. मराठीतील आघाडीच्या गायकांनी या चित्रपटासाठी गायन केले आहे. संगीताची जाण असणाऱ्या संगीतकार रफीक शेख यांच्या संगीताने हा चित्रपट सजवला आहे, त्यामुळे ‘निवडुंग’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं परिपूर्ण पेकेज ठरणार आहे.
भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून सारा श्रवण, अस्ताद काळे, प्राजक्ता दिघे, शेखर फडके यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा मुनावर भगत यांनी लिहिली असून महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. शशिकांत मिना या सिनेमाचे सहदिग्दर्शक असून एकेन. सेबास्टेन या सिनेमाचे केमेरामन आहेत. मेघा सपंत यांनी या चित्रपटातील तीन गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. या सिनेमातील गीतांना संगीतकार रफिक शेख यांनी संगीत दिले असून कार्यकारी निर्माते आहेत संदिप मोरे.