जहांगीर कला दालनात खुणावणारे चित्रप्रदर्शन
चित्र, स्थापत्य, दृकश्राव्य आणि प्रायोगिक कला सादरीकरण असा अनोखा संगम मुंबईतील जहांगीर कला दालनात भरला आहे. नागपूरमधील सुधीर विनायक बागडे, निखिल रमेश काळे आणि नितीन पंजाबराव काळबांडे या तीन युवा रंगलेखकांचे ‘स्ट्राईव्ह आणि सराउंडिंग’ या शीर्षकाचे कला प्रदर्शन २९ ऑगस्टपासून सुरु झाले असून ते ४ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार डॉ. आशीष देशमुख, प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शिंदे, सिने अभिनेत्री आहाना कुमरा, चित्रपट दिग्दर्शक इरफान शेख, प्रसिद्ध चित्रकार डॉ. मनीषा पाटील, चरणसिंग ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये सभोवतालच्या जगण्याचा संघर्ष या युवा चित्रकारांनी रंगलिखित केला असून, तो कल्पकतेने मांडला आहे.
सुधीर यांनी त्यांच्या ‘ब्लॅकडायमंड’ या चित्रातून कोळसा खाणीतील कामगारांच्या आयुष्याचे विविध पैलू उलगडताना खाणीच्या आतील काळोखातून बाहेरच्या जगाला प्रकाशमान करणारी ऊर्जा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
निखिल यांनी त्यांच्या ‘किस्मत कि चाबी’ या चित्रामध्ये आजच्या शिक्षणाच्या पदवीचा कशाप्रकारे भाजीपाला झालेला आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
नितीन यांनी शहरातील जीवन आणि संघर्षासोबतच खिडकीच्या आतील आणि खिडकीच्या बाहेरील जीवन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या ‘पेंडुलम’ या चित्रशीर्षकामध्ये घड्याळाच्या काट्यावर फिरणाऱ्या शहरातील जीवनाचा संघर्ष आणि जीवन जगण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत यांचे वास्तवरूप रेखाटले आहे.
निखिल काळे यांचे ‘किस्मत कि चाबी’ हे आर्ट परफॉर्मन्स, सुधीर बागडे यांचे इन्स्टॉलेशन आणि नितीन काळबांडे यांचे ‘हॅम्पर’ हे व्हिडीओ आर्ट या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण आहे.