यूएसमधील रसिकांना ऐकवतेय ‘वेड लागले प्रेमाचे’
गायन आणि अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यानंतर संगीतकाराच्या रूपात समोर आलेली केतकी माटेगावकर सध्या खूप लाईमलाईटमध्ये आहे. केतकीच्या कलागुणांची चर्चा आता साता समुद्रापार पोहोचली आहे. गायन आणि अभिनयाच्या बळवर प्रेक्षकांना मोहिनी घालणारी केतकी आता यूएसमधील रसिकांना ‘वेड लागले प्रेमाचे’ ऐकवत आहे.
या दौऱ्यात तिची आई सुवर्णा माटेगावकर यांची तिला मोलाची साथ लाभली आहे. ९ सप्टेंबर २०१६ पासून केतकी युएस मुक्कामी आहे. या दौऱ्यात ती ‘वेड लागले प्रेमाचे’ या संगीतरजनी अंतर्गत आपल्या गाजलेल्या गाण्यांचा नजराणा सादर करणार आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात ती युएसमधील वेगवेगळया शहरांमध्ये ‘वेड लागले प्रेमाचे’ या कार्यक्रमाचे शो करणार आहे.
९ सप्टेंबरला चार्लोट, १० सप्टेंबरला फिलाडेल्फिया, ११ सप्टेंबरला न्यूयॉर्कला हे कार्यक्रम यशस्वी करून आता १७ सप्टेंबरला अटलांटा, २४ सप्टेंबरला डेट्रॉइट, १ ऑक्टोबरला डल्लास, २ ऑक्टोबरला ऑस्टिन, ८ आणि ९ ऑक्टोबरला लॉस एंजेलिस तसंच १५ ऑक्टोबरला सेन फ्रँसिस्को येथे ‘वेड लागले प्रेमाचे’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
या सर्व कार्यक्रमांच्या संगीत संयोजनाची जबाबदारी केतकीचे वडील पराग माटेगावकर सांभाळणार आहेत. केतकीने जरी आजवर केवळ मराठी चित्रपटांमध्येच अभिनय केला असला, तरी अमराठी प्रेक्षकांनाही तिच्या गाण्यांनी वेड लावलं आहे. केतकीची गाणी केवळ भारतातीलच संगीतरसिकांचे कान तृप्त करीत नाहीत, तर दूर देशी वसलेल्या अनिवासी भारतीयांनाही आपलीशी वाटतात. परदेशातील रसिकांचे कान प्रत्यक्षात तृप्त करण्यासाठी केतकी परदेशवारीला निघाली आहे.
याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना केतकी म्हणाली, ‘मी केवळ माझं काम करतेय. संगीताची सेवा करणं हे माझं परम कर्तव्य आहे. रसिक मायबाप यांना माझं काम आवडतंय, यातच मी स्वतःला धन्य मानते. भारतीय प्रेक्षकांइतकंच परदेशात राहणारे आपले बांधवही माझ्या गीत-संगीत-अभिनयावर प्रेम करतात. त्यांनाही मला कधीतरी प्रत्यक्ष गाताना पाहायचं असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या परदेश दौऱ्याचं आयोजन केलं जातं. या युएस दौऱ्याच्या आयोजनात तिथल्या भारतीयांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्या चोख आयोजनामुळे तसंच प्रेमामुळेच परदेशात जाऊन मी माझ्या मातीतील म्हणजेच मराठी गीतांचा कार्यक्रम करू शकतेय. भविष्यात खूप काही करायचं आहे. पण सर्वप्रथम गीत-संगीताची सेवा करायची आहे. माझ्या तसंच ‘वेड लागले प्रेमाचे’ या शोच्या माध्यमातून आजच्या काळातील मराठी गाणी आज परदेशात पोहोचत असल्याचा मला अभिमान असून आनंदही होत आहे.