दहिसर येथील स्वरसाधना या संस्थेच्या बतीने ३१ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटरमध्ये पं. गोविंदराव पटवर्धन, पं. राम मराठे आणि डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावर आधारित ‘संगीतांजली’ हा अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे.
ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि आर्गन वादक पं. गोविंदराव पटवर्धन यांचा ३१ डिसेंबर रोजी १९ वा स्मृतिदिन आहे. पु.ल. देशपांडे यांनी गोविंदरावांना ‘बोटांनी गाणारा जादुगार’ असे गौरविले होते. हजारो मैफिली आणि संगीत नाटकांसाठी अनेक दिग्गज कलाकारांना गोविंदरावांनी आपल्या सहज सुंदर वादनाने साथसंगत केली होती.
गोविदरावांचे समकालीन परंतु त्यांना गुरुस्थानी असलेले दोन दिग्गज घरंदाज शास्त्रीय गायक, रंगभूमीवरील गायक, नट, अभिनेते, संगीतकार म्हणजे पं. राम मराठे आणि डॉ. वसंतराव देशपांडे. या बुजुर्ग त्रयींचे स्मरण करणारा असा हा त्रिवेणी ‘संगीतांजली’ कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रमात राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात द्वितीय पुरस्कार प्राप्त ‘संगीत गोविंद गौरव’ हा धनंजय मेहेंदळे निर्मित लघुपट दाखवला जाणार आहे. त्याशिवाय त्रयींचे ध्वनिमुद्रण, चित्रण, छायाचित्रे आणि प्रत्यक्ष सादरीकरणही असणार आहे.
या कार्यक्रमामध्ये गायक आणि संगीतज्ञ मुकुंद मराठे, डॉ. विद्याधर ओक आणि प्रदीप धोंड याशिवाय केशव जोशी, सुमंत बिवलकर, आदित्य पानवळकर हे वादक सहभागी होत आहेत. कार्यक्रम पत्रिका आणि अधिक माहितीसाठी ‘स्वरसाधना’शी ९९६९४४७२८८ या मोबाईलवर संपर्क साधता येईल.