पृथ्वी थिएटरमध्ये १६ मे रोजी २५वा प्रयोग
गेल्या वर्षभरात विविध नाट्यमहोत्सवांमध्ये विशेषत्वाने गाजलेल्या अस्तित्व, मुंबई आणि मितीचार,कल्याण निर्मित युगंधर देशपांडे लिखित आणि रवींद्र लाखे दिग्दर्शित ‘अगदीच शून्य’ या प्रायोगिक नाटय़ चळवळीतल्या महत्वाच्या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग येत्या मंगळवारी १६ मे रोजी संध्याकाळी सहा वाजता जुहूच्या पृथ्वी थिएटर मध्ये संपन्न होणार आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक रवी लाखे यांच्या सर्जनशील मार्गदर्शनातून आकाराला आलेले हे नाटक दिग्दर्शन कसे असावे याचा वस्तुपाठ म्हणून गौरवले जात आहे. प्रायोगिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाने वेगळे स्थान निर्माण केलेले अक्षय शिंपी, अमोल कुलकर्णी तसेच ऋतुराज फडके या तिघांच्या अस्सल अभिनयाने हा प्रयोग रंगतो. प्रीतीश खंडागळे यांचे अपेक्षित परिणाम साधणारे संगीत, मकरंद मुकुंद यांची समर्पक प्रकाशयोजना याही बाबी नाटय़परिणाम उंचावण्यात मोलाची भर घालतात. केवळ पुरस्कारांसाठी प्रायोगिक नाट्यनिर्मिती होण्याच्या सध्याच्या काळात प्रयोगातले सातत्य राखून रौप्यमहोत्सवी वाटचाल करणे हे या नाटकाचे यश आहे.