‘सत्यम शिवम सुंदरम’चा सहज सुंदर आविष्कार
नेहरू आर्ट गॅलरी वरळी येथे चित्रकार भागवत मुऱ्हेकर यांच्या ‘दि साउंड ऑफ निर्गुणा’ या प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. २० सप्टेंबरपासून सुरु झालेले हे प्रदर्शन २६ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. आपल्याला आपल्याच मनाच्या गाभाऱ्यात घेऊन जाणारा आणि सत्यम शिवम सुंदरमची अनुभूती देणारा हा समृद्ध कलाविष्कार आहे. परमेश्वराच्या निर्गुण निराकार रूपाचा तो सहज सुंदर असा दृष्य आविष्कार आहे.
या प्रदर्शनातील सर्वच चित्रांना एक आध्यात्मिक टच आहे. यातले कुठलेच चित्र काढायचे म्हणून काढलेले वाटत नाही. प्रत्येकच चित्र एका अंतप्रेरणेतून साकार झाल्यासारखे वाटते. त्यांची ही कला म्हणजे निर्गुण निराकार ईश्वराशी संवाद साधण्याचे, त्याचबरोबर आत्मशोधाचे माध्यम आहे. चित्रकार सैर हैदर रझा यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, ‘दिव्य शक्ती के बिना चित्र नाही बनते.’ आणि खरोखरच मुऱ्हेकरांची चित्रे पाहताना त्यांच्या ठायी असलेल्या या दिव्य शक्तीचा आपाल्याला प्रत्यय येतो.
ओम, गोपद्म, शंख, शिवलिंग, भस्माची त्रिपिटी, नाग, नंदी, कामधेनू, स्वस्तिक, गंध भारतीय संस्कृतीची ही सगळी पवित्र प्रतीके आहेत. या प्रतीकांच्या माध्यमातून त्यांनी परमेश्वराच्या निर्गुण तत्वाला स्पर्श केला आहे. त्यांच्या मनातील सश्रद्ध भाव चित्रांमधून डोकावतोच पण आपल्यालाही ही चित्रे कुठेतरी परमेश्वरांशी जोडून देतात. चित्रातले सात्विक सौंदर्य मनावर गारुड घालत राहते. ते पाहता पाहताच एका क्षणी नकळत आपले डोळे बंद होतात आणि एक अनाहत नाद आपल्याला आतला आवाज ऐकू येऊ लागतो. मुऱ्हेकरांना अभिप्रेत असलेला निर्गुणाचा आवाज कदाचित हाच असावा.
श्रेष्ठ संगीतकार नौशाद यांनी एकदा अशी अपेक्षा व्यक्त केली की, ‘आकारांचे आणि रंगांचे स्वर बनावेत, त्यातून आल्हाददायक संगीतमय प्रवाह खळखळत राहावा.’ या विचारांनी मुऱ्हेकर प्रचंड प्रभावित झाले. त्यातूनच प्रेरित होऊन गेली जवळपास २७-२८ वर्षे रंग आणि आकाराशी ते खेळत राहिले, त्यांचा मागोवा घेत राहिले. त्यातूनच त्यांना कधीतरी आत्मबोधाचा साक्षात्कार झाला. रंगाचे आणि आकाराचे स्वर ऐकू येऊ लागले. त्यातूनच त्यांच्या या सगळ्या चित्रांचा प्रवास घडत गेला.
चित्रकार भागवत मुऱ्हेकर गेली जवळ जवळ २५ वर्ष वसईत वास्तव्यास असून, वर्तक शाळा वसई येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. एल. एस. रहेजा आर्टस् स्कुल, बांद्रा येथे त्यांनी आपले कलाशिक्षण पूर्ण केले आहे. जी.डी. आर्ट पेंटिंगमध्ये महाराष्ट्रातून पाचवे तर ए.टी.डी.मध्ये महाराष्ट्रातून तिसरे आलेले ते मेरिट स्टुडंट आहेत. आपल्या या कलेसाठी त्यांना हॅंडीकॅप वेलफेअर संस्था दिल्ली यांच्या राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच प्रो. कर्णिक स्पेशल वार्षिक कलाप्रदर्शनाचा पुरस्कार, राज्य कला प्रदर्शन पुरस्कार, आदर्श कला शिक्षक पुरस्कार अशा अनेक मनाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर ललित कला अकादमी अन्युअल आर्ट एक्झिबिशन, चेन्नई, सेकंड इंडियन ड्रॉईंग बिनाइल एक्झिबिशन, चंदीगड, त्याचबरोबर कलादीप स्टुडंट असोसिएशन, जे. जे. स्कुल ऑफ आर्टस्, मुंबई एक्स्ट्रा करिक्युलम प्रोग्राम फॉर स्केच अशा अनेक प्रदर्शनातून त्यांची चित्रे प्रदर्शित झाली आहेत. इतके सगळे असूनही आतापर्यंत प्रसिद्धिपराङ्मुख राहून ते फक्त आपल्या कलेची साधना करत राहिले आहेत. या प्रदर्शनामागे देखील फक्त प्रसिद्धी हा हेतू नाही तर कलात्मक पातळीवर संस्कृतीतील या सगळ्या पवित्र प्रतिकातले सौंदर्य, त्यातले आध्यात्म, त्यातले निर्गुण तत्व रसिकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे.
-संगीता सुहास अरबुने
ई सी ७, ए ००३, एव्हरशाईन सिटी वसई, पूर्व ४०१ २०५
sangita.suhas@gmail.com
संपर्क क्रमांक फोन : ९५२५०-२४६२९६५
(लेखिका प्रसिद्ध कथाकार, कवयित्री आणि लेखिका आहेत.)
चित्रकार भागवत मुऱ्हेकर यांचा संपर्क : ९४२०२९९७८०