जगभरात वेगवेगळे चित्रकार आपापल्या शैलीने, प्रयोगांनी, त्याच्या चित्रविषयांसाठी प्रसिद्ध आहेत. अशा चित्रकारांची माहिती (रंगमैत्र.कॉम) rangmaitra.com या आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करत आहोत. या निमित्ताने वेगवेगळ्या चित्रकारांचा जीवनप्रवासही या वेबसाईटवर आपण प्रसिद्ध करीत आहोत. आज याच सदरात निसर्गप्रेमी चित्रकार संतोष भोईर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत…
मनुष्य आणि प्राणी हे सहजीवी मानले जातात. जसजशी प्रगती होत गेली, तसतसे समाजात निश्चितच अनेक बदल झाले. तरीही ही पृथ्वी आपण या प्राण्यांसोबत वाटून घेतो, हे सत्य काही बदलू शकत नाही. आपला भूतकाळही आपल्याला हेच सांगतो. जे प्राणी आपण पाळतो, त्यांना तर आपण विसरूच शकत नाही. आपल्या पौराणिक कथांमधूनही याचे दाखले मिळतात. गाय, म्हैस, हरीण, अस्वल, माकड, हत्ती, मोर अशा अनेकांचा पंचतंत्राच्या गोष्टीत उल्लेख आढळतो. ते आपल्याप्रमाणेच वागतात, बोलतात. विचारही आपल्याप्रमाणेच करतात. जातककथांमध्येदेखील असाच प्रकार आढळतो. यातूनही माणूस आणि प्राणी यांचे दृढ संबंध दिसतात. या कथांपासून प्रेरणा घेत तसेच शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा फायदा घेत संतोष भोईर यांनी जे वातावरण लहानपणापासून अनुभवलं, तेच ते आपल्या चित्रांमधून मांडतात. आपल्या विस्मृतीत गेलेल्या या आठवणींना यामुळे कदाचित उजाळा मिळेल. मनुष्य आणि प्राण्यांच्या या परस्पर मैत्रीभावाबद्दल संतोष कृतज्ञता व्यक्त करतात. मनुष्यनिर्मित मशीनच्या आणि काँक्रीटच्या जंगलात राहून आपण या गोष्टी विसरल्याची खंत त्यांना वाटते. ही पृथ्वी केवळ आपलीच नव्हे तर या प्राणीमात्रांची देख्रील आहे, याची जाणीव करून देण्यासाठीच ही चित्रे रेखाटली आहेत. निसर्गचक्र सुरळीत सुरू राहण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे. या परस्परसंबंधांबद्दल ते प्रश्नही करत नाहीत किंवा उत्तरेही मागत नाहीत. केवळ या परस्परनात्याबद्दल ते समाधान व्यक्त करतात.
चित्रकाराची चलचित्रफीत
चित्रकाराचे मनोगत
संपूर्ण सृष्टी त्या सृष्टीतील तो निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्या निसर्गाला, सृष्टीला जोपासणे हे मानवाचे आद्य कर्तव्यच नव्हे का? खरंतर हा प्रश्न प्रश्नच आहे, कारण मानवाला त्या निसर्गावर मात करायचे ठरवले आहे. आपल्या स्वार्थासाठी निसर्गाच्या जीवावर उठला आहे.एवढेच नाही तर त्या सुंदर सृष्टी ज्या भगवंताने बनवली त्या मानवाला ज्याने घडवले त्या भगवंताची ही त्याला भीती नाही. म्हणून मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केला. जंगल जमिनीवरील प्राणी, झाडे, डोंगरदऱ्या, मुक्तपणे संचार करणारे पशुपक्षी यांचे जगणे मर्यादित झाले आहे. सर्वांचे जीवन धोक्यातच नव्हे तर नष्ट होऊ लागले. या निर्मळ नद्या, स्वच्छ जंगल, प्रामाणिक प्राणी, या सृष्टीतील प्रत्येक जीव, या सर्व घटकांचा खरेपणा, प्रामाणिकपणा मैत्री, स्वावलंबन हे सर्व मला भावले कारण या सर्व प्रकारांपासून मानव दूरच गेला आहे. या निसर्गातील तो हिरवा रंग तर माझे मन प्रफुल्लीत करतो. मी कितीही थकलेला असेन तरीही मी कॉलेजमधून त्या सीएसटी गर्दीतून वैतागून घरी आल्यावर आधी शेतावर जाऊन एक फेरी मारून तो थकवा दूर करायचो. जणू काही मला रिफ्रेश मारायचे बटनच त्या निसर्गाच्या हातात आहे. प्राण्यांमधील तो प्रामाणिकपणा पाहून मला त्यांचा आकार आपोआपच सुचायला लागतात. त्यांच्या या बाह्य आकारावरून देहबोलीतून त्यांच्या मनातील विचार माझ्या कुंचल्यातून आपोआपच येतात. झाडाखाली बसल्यावर त्या सावलीत मला आईच्या पदराखाली बसून आई हळुवार हवा घालावी असेच भासते. मानव म्हणतो आम्ही सुधारलो, आपण खरोखरच सुधारलो आहोत का ? जमीन नाहीशी केली बिल्डिंगचे जंगल उभारले जंगलतोड करून त्या मुक्या प्राण्यांची घरे उद्ध्वस्त करून आपली घरे, बंगले उभारले. पोटासाठी प्राण्यांच्या जीवावर उठले आणि म्हणे आम्ही सुधारलो. ठीक आहे विज्ञानाने मानवाला खूप पुढे नेऊन ठेवले आहे.परंतु त्याच्या विज्ञानाचा गैरवापर करून निसर्गाची विरोधात जात आहे. सुनामी कधीही येते पाऊस कधी येतो वादळ कधीही सुरू होतो थंडी कधीही पडते निसर्गाचे ऋतुचक्रात ही आपण बदल घडवले, म्हणून जर असे वागत राहिलो तर ही सृष्टी हा निसर्ग नाहीसा व्हायला वेळ लागणार नाही. मला एक चित्रकार म्हणून असे वाटते की या निसर्गातील सृष्टीतील सर्व जीव प्राणी, वनस्पती, नद्या, डोंगर यांच्यासारखे आपण मैत्रित राहिलो, समाधानी राहिलो तर आज या निसर्गाला आपण वाचवू शकतो. प्रत्येकाने स्वार्थी विचार न करता एकमेकांविषयी सहानुभूती प्रेम आपुलकी दाखवली तर हे शक्य आहे म्हणून माझ्या प्रत्येक आकारांमध्ये सहजता आणि लयदार रेषापासून तयार झालेला आकार या आकारांमध्ये प्रत्येक प्राण्याच्या मानवाचा वनस्पतींच्या फुलांचा समावेश दिसतो जणूकाही प्रत्येक आकार हा एकमेकांसाठीच तयार झालेला आहे. त्यातून सहानुभूती प्रेम आपुलकी सहजता दिसून येते आणि या आकारासारखे आपण जर प्रामाणिक राहिलो वागलो तर नक्की म्हणता येईल मानवाला की आम्ही खरंच सु धरलो !या वाक्याप्रमाणे आपण आपलं निसर्ग ही सृष्टी अशीच हिरवीगार ठेवू शकतो.
चित्रकाराचा जीवनप्रवास
संतोष बी. भोईर
* जन्मतारीख : ६ जून १९७९
* पत्ता : टेमघर पाडा, कल्याण रोड, पाईपलाईन, पोस्ट : दांडेकरवाडी, भिवंडी : ४२१३०२, जिल्हा : ठाणे
* भ्रमणध्वनी : ०९८५०६६१७६७
* ईमेल : santoshbhoir79@gmail.com
शैक्षणिक पात्रता
* १९९९ – २००० : ए.टी.डी जे.जे. कॉलेज, मुंबई
* २००२ – २००३ : जी.डी. आर्ट, डिप्लोमा इन फाईन आर्ट, करंदीकर कला अकादमी, मुंबई.
सहभाग
* बॉम्बे आर्ट सोसायटी – २००२
* बॉम्बे आर्ट सोसायटी – २००३
* कॅम्लिन आर्ट कॉम्पिटिशन – २००३,
* कॅम्लिन आर्ट कॉम्पिटिशन – २००४,
* मान्सून शो, जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई – २००५
* व्ही.व्ही. ओक फाउंडेशन – २००३
* पी.एल. देशपांडे गॅलरी, मुंबई – २००७
एकल प्रदर्शन
* आर्ट देश – द स्टुडिओ, मुंबई – २००८
* द वॉक गॅलरी, मुंबई – २००८
* लीला आर्ट गॅलरी, मुंबई – २००७,
* प्रदर्शक आर्ट गॅलरी, मुंबई – २००७,
* प्रदर्शक आर्ट गॅलरी, मुंबई – २००६,
* प्रदर्शक आर्ट गॅलरी, मुंबई – २००५,
* गॅलेरिया रेबायंदर, गोवा – २००५
* आर्ट प्लाझा, मुंबई – २००२
कलेक्शन
* श्री. बेंड्रा स्टर्नक्विस्ट, युएसए
* श्री. मनिष मल्होत्रा, युएसए
* श्री. आलोकनाथ, चित्रपट कलाकार,
* श्रीम. राजश्री जग्गी, मुंबई
* मेसर्स व्ही.पी. फायनान्स, के. राहगर कन्स्ट्रक्शन, मुंबई
* वास्तूविशारद – भावना जेकॅप, मुंबई
* श्री. गे पॉटर, लंडन
* श्री. दीपक गोसरानी, केनिया
* मेसर्स युनायटेड फॉस्फरस कंपनी, मुंबई यांच्यासह भारत तसेच परदेशातही अनेकांनी त्यांनी रेखाटलेली चित्रे खरेदी करून संग्रहात ठेवली आहेत.
काही निवडक चित्रकलाकृती