पहिल्या चित्रपटाचा वैजापूर येथे झाला मुहूर्त
अनेक चित्रपट आणि गाजलेल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री, नृत्यांगना दीपाली सय्यद आता निर्माती झाली आहे. तिची निर्मिती असलेल्या पहिल्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच वैजापूर येथे संपन्न झाला.
“ग्लोबल मीडिया कोर्पोरेशन”च्या श्रेयस कामले, राजेंद्र कामले यांच्या सोबत अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अद्याप या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात आहे. अशोक कामले, सुरेंद्र वर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून लेखा त्रिलोक्य यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे तर कॅमेरामन म्हणून अरविंद सिंह हे काम पाहत आहेत
चित्रपटाची कथा एक आगळी वेगळी प्रेमकथा असून प्रेक्षकांना पुरेपुर मनोरंजन देणारा हा चित्रपट आहे . राज, मिली आणि गौरी यांची ही एक अनवट प्रेमकथा आहे. खरं प्रेम, आयुष्य, नातेसंबंध, शहर आणि गावातलं जगणं, राजकारण यांचा वेध या चित्रपटातून घेण्यात येणार आहे. अनुपसिंग ठाकूर हा हँडसम हंक या चित्रपटातून पहिल्यांदा मराठी प्रेक्षकांपुढे येणार आहे. अनुपनं या पूर्वी महाभारत ही मालिका, कमांडो हा हिंदी चित्रपट आणि दक्षिणेतील काही चित्रपट केले आहे. सिक्स पॅक अॅब्ज असलेला हा अभिनेता नक्कीच प्रेक्षकांवर छाप पाडेल. त्याच्यासह गजनी फेम प्रदीप रावत दीपाली सय्यद, वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, पंकज विष्णू, अपूर्वा कवडे, दिलीप वाघ, साहेबराव पाटील यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.