अंकुश चौधरीच्या अतरंगी लूकमुळे ‘देवा’ या सिनेमाची सध्या भरपूर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या चर्चेला आता नवीन विषय मिळालाय. तो म्हणजे या सिनेमाचे संगीतकार अमितराज याचं गाणं! संगीताचा जादुगार असलेला अमितराजच्या या गाण्याला चक्क श्रेया घोशालचा आवाज लाभला आहे.
‘देवा’ला श्रेयाचा स्वरसाज!
श्रेया घोशालच्या आवाजातील हे गाणे ‘देवा’ या सिनेमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या गाण्याचे नुकतेच रेकोर्डिंग झाले आहे. प्रत्येक संगीतकाराचे आपल्या आवडत्या गायकांसोबत काम करण्याचे स्वप्न असते. अमितराजदेखील त्याला अपवाद नाही. मात्र देवाच्या निमित्ताने त्याला त्याची आवडती गायिका श्रेया घोशालसोबत काम करण्याची संधी मिळाली. या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांचे गीत लाभले आहे. आता या भन्नाट तिकडीकडून आपल्याला नक्कीच काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल.
इनोव्हेटिव्ह फिल्मस आणि प्रमोद फिल्मस् यांची संयुक्त निर्मिती असलेला हा सिनेमा नवीन वर्षी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणार आहे. कोकणात चित्रीकरण झालेल्या या सिनेमाचे साऊथचे सुप्रसिध्द दिग्दर्शक मुरली नलप्पा यांनी दिग्दर्शन केले आहे. श्रेयाच्या आवाजातील हे गाणे ‘देवा’ या सिनेमाच्या प्रसिद्धीला चारचाँद लावणारं ठरेल यात शंका नाही.