मुख्यमंत्री पर्रीकर व अभिनेत्री श्रध्दा कपूर यांच्या हस्ते प्रकाशन
गोवा येथे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (इफ्फी)च्या उद्घाटन सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या हस्ते डॉ. प्रवीण नारायण महाजन, अपर महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा व अध्यक्ष निर्झर सिने क्लब नागपूर यांच्या ‘मराठी साहित्य आणि चित्र पटकथा –शतकी वाटचाल (१९१३-२०१३ )’ या नाविन्यपूर्ण विशाल संशोधन ग्रंथाचे प्रकाशन झाले.
प्रशासक, व्यवस्थापक, अभियंता, ज्योतिषी, मानसशास्त्रज्ञ, लेखक, कवी, नाट्यलेखक, नाट्य दिग्दर्शक, अभिनेता, संपादक, चित्रपट समीक्षक, गायक, छायाचित्रकार, वृतपट-लेखक, दिग्दर्शक, संपादक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या लेखकाने राष्ट्रीय स्तरावर आपली मुद्रा उमटविली. प्रेक्षक, प्रेस मिडिया, समीक्षक या सर्वाना हा ग्रंथ आवडला. ‘चित्रपटकथेला साहित्यात मानाचे स्थान देणारा अपूर्व ग्रंथ’ अशी या ग्रंथाची कॅच लाईन आहे.
शंभर वर्षातील मूळ पटकथा, तसेच साहित्यकृतीवर आधारित पटकथेचे सूक्ष्म अध्ययन या ग्रंथात आहे. अत्रे, खांडेकर, विजय तेंदुलकर, ग. दि. माडगूळकर, अशोक पाटोळे यांच्या पटकथा, गो. नी. दांडेकर, रणजीत देसाई यांच्या मूळ कथा यांचा सविस्तर अभ्यास आहे. व्ही. शांताराम ते मृणाल कुळकर्णीपर्यंत दिग्दर्शकीय संस्काराची समीक्षा यात आहे. आंतरबाह्य आंतरराष्ट्रीय गुणवत्तऐशी बरोबरी साधणारा हा ६५६ पानांचा हा ग्रंथ अत्यंत आकर्षक ठरला आहे.
ग्रंथ प्रकाशनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ‘आगामी फिल्म फेस्टिवल’मध्ये ग्रंथापाठोपाठ आपली फिल्मसुद्धा येऊ द्या’ अशी अपेक्षा डॉ. महाजन यांच्याकडून केली. छान मराठी बोलणाऱ्या श्रध्दाने ‘मराठी सिनेमात चांगली भूमिका मिळाली तर मी नक्की काम करेन’ असे दिलखुलासपणे डॉ. महाजन यांना सांगितले.
कार्यक्रमाच्या वेळी निर्झर सीने क्लब नागपूरचे सचिव समीर नाफडे व कोषाध्यक्ष सुरेंद्र आष्टीकर उपस्थित होते.