शीतल कांबळे यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरु
सुप्रसिद्ध रंगलेखिका शीतल कांबळे यांच्या चित्रकृतींचं ‘एक्स्प्रेशन्स’ हे प्रदर्शन मुंबईत नरिमन पॉईंट येथे असलेल्या ट्रायडंट हॉटेलमधील आर्ट वॉक गॅलरीत २७ फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे. १२ मार्चपर्यंत सकाळी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत कलारसिकांना हे प्रदर्शन विनामूल्य बघता येणार आहे.
चित्रकार शीतल कांबळे यांनी आजवर देशभरात अनेक समूह आणि एकल चित्रंप्रदर्शनांद्वारे आपल्या कलाकृती रसिकांसमोर सादर केल्या आहेत. स्त्रीशक्तीचा साक्षात्कार घडवणारं हे त्याचं पुढचं प्रदर्शन आहे. स्त्रीकडे संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ति म्हणून पाहिलं जातं. स्त्री ही जीवनाचा आत्माच आहे. जीवनातील लाभ आणि हानी यांचा लेखाजोखा स्त्रीच्या रूपाने सामोरा येतो. आई, बहीण, जोडीदार आणि एक मित्र म्हणून स्त्री आपली भूमिका पार पाडत असताना तीच्या भावभावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतात. स्वातंत्र्यासाठी पक्षी आणि शुद्ध सात्विकतेचं लक्षण म्हणून कमळाचा प्रतीकात्मक वापर या चित्रांमधून केलेला दिसतो.
एक्रिलिक रंगातील कॅनव्हासवरची ही चित्रं स्त्रीची सोज्वळता, कमनीय बांधा, साज-शृंगार, पावित्र्य अशा अनेक रूपात आपल्याला सामोरी येतात. तालबद्ध, लयदार आणि आनंद, उल्हासाने भारून टाकणारी स्त्री वेगवेगळ्या रुपात या प्रदर्शनात आपल्याला भेटते.