ट्रेलर लॉन्च सोहळ्यात टाळ्यांचा कडकडाट
सध्या सगळीकडे चर्चा असलेल्या `घंटा` या धमाल विनोदी चित्रपटाचे म्युझिक आणि ट्रेलर अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत लॉंच झाले. महेश मांजरेकर, संजय मोने, जीतेंद्र जोशी दिग्गज कलावंतांनी ‘घंटा’ चित्रपटातील अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी आणि आरोह वेलणकर या कलाकारांचा ‘घंटा-टोस्ट’ केला आणि उपस्थित तारकादळे हास्यकल्लोळात बुडून गेली.
या ‘घंटा-टोस्ट’च्या तावडीतून अमृता खानविलकरसारखी अभिनेत्रीही सुटली नाही. ‘घंटा’ चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या पुष्कर श्रोत्री याने या ‘घंटा-टोस्ट’मध्येही सूत्रसंचालकाची महत्त्वाची भूमिका बजावत सगळ्यांना खुमासदार पद्धतीने झुंजवले. एकूणच, या ‘घंटा-टोस्ट’मुळे `घंटा` हा चित्रपट कसा असेल, याची जबरदस्त उत्कंठा उपस्थितांमध्ये निर्माण झाली.
अमेय, सक्षम आणि आरोह यांनी सादर केलेल्या धमाल मोशन पोस्टरने ‘घंटा’च्या प्रमोशनला प्रारंभ झाला होता. त्यानंतर आलेला ‘घंटा’चा टीझरही चर्चेचा विषय बनून गेला. `यू ट्यूब`वर सव्वा लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला. त्या पाठोपाठ अमेय-सक्षम- आरोह या त्रिकुटाने फेसबुकवरूनत्यांच्या चाहत्यांशी लाइव्ह संवाद साधला. या अभिनव प्रमोशनमुळे ‘घंटा’ हा चित्रपट प्रत्येकाच्या मनात घणघणू लागला आहे. अशा पार्श्वभूमीवर बुधवारी पारंपरिक प्रकारांना फाटा देत ‘घंटा’ टीमने ‘घंटा-टोस्ट’ हा छोटेखानी कार्यक्रम सादर करत चित्रपटाचा ट्रेलर, तसेच म्युझिक व्हिडिओ लॉंच करत धमाल उडवून दिली.
`घंटा` हा आरोह -अमेय-सक्षम या त्रिकुटाने केलेल्या उचापतींनी भरलेला सिनेमा आहे. मुंबईत स्ट्रगल करत असेलेले हे तिघे जगण्यासाठी काय उद्योग करतात, याचं खुमासदार चित्रण दिग्दर्शक शैलेश काळे यांनी या चित्रपटात केलं आहे. तरुणाईच्या विषयावरचा, तरुणाईच्या भाषेतला हा चित्रपट असला, तरी तो सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असा आहे. `दशमी स्टुडिओज`, `ब्रह्मपुरा पिक्चर्स` आणि `यलो इन्कोर्पोरेशन` यांनी हा चित्रपट सादर केला आहे.
`दशमी क्रिएशन्स`ने अल्पावधीत टीव्ही क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. निर्माते नितीन वैद्य, निनाद वैद्य यांच्या या प्रॉडक्शन हाउसच्या `दुर्वा` या मालिकेने एक हजार एपिसोडसचा टप्पा ओलांडला आहे. त्यांच्या `माझे मन तुझे झाले`, `पसंत आहे मुलगी` या मालिकांनाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. `घंटा` या चित्रपटाच्या निमित्ताने ही कंपनी चित्रपट क्षेत्रातही भक्कम पाय रोवण्यासाठी सज्ज आहे.
शैलेश काळे आणि रोहित शेट्टी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुमित बोनकर आणि राहुल यशोद यांनी या हटके सिनेमाचं लेखन केलं आहे. फ्रेश लूक, धमाल प्रेझेंटेशन ही सिनेमाची वैशिष्ट्यं आहेत. चित्रपटाचे टीझर्स, जाहिराती आणि म्युझिकमधून निर्माण झालेली उत्सुकता पूर्ण करण्यासाठी प्रेक्षकांना 14 ऑक्टोबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.