राज पैठणकर दिग्दर्शित नवा सिनेमा
लहान मुलांचे आजवर प्रकाश झोतात न आलेले भावविश्व प्रेक्षकांसमोर घेऊन येणारा ‘गोप्या’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गणेश फिल्म्स ऍण्ड एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत अमोल भालेराव, नितिन पगारे आणि राज पैठणकर यांनी ‘गोप्या’ची निर्मिती केली आहे. राज पैठणकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
व्यसनाच्या आहारी गोलेला पिता आणि संसाराचं रहाटगाडगं ओढण्यासाठी मोलमजुरी करणारी माता यांच्या पोटी जन्मलेल्या गोपी नावाच्या मुलाभोवती या सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले आहे. शिकण्याची तीव्र इच्छा पण घरी अठरा विश्व दारिद्रय. यातून गोपी कशाप्रकारे आपली वाटचाल करतो याचे चित्रण ‘गोप्या’ सिनेमामध्ये करण्यात आले आहे. आदित्य पैठणकर हा गोप्याच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत माधवी जुवेकर, कमलेश सावंत, मनीषा पैठणकर, मानसी मुरूडकर, उदय सबनीस, अजय जाधव, समीर विजयन, राजेश भोसले, प्रकाश धोत्रे, अमीर तडवळकर, निवास मोरे, जयवंत वाडकर आदी कलावंत आहेत.
योगेश सबनीस यांनी ‘गोप्या’साठी संवादलेखन केले असून पटकथा योगेश महाजन यांची आहे. छायालेखक अनिकेत के. यांनी ‘गोप्या’चे छायालेखन केले आहे. दिग्दर्शक राज पैठणकर यांनी यासिनेमासाठी गीतरचना केल्या असून कथाही त्यांचीच आहे. संगीतकार किरण-राज या जोडीने या सिनेमाला संगीत दिले आहे. डॉ. नेहा राजपाल, किरण पैठणकर आणि बालगायक रोहित वाघ यांनी या सिनेमातील गीते गायली आहेत. देवदत्त राऊत आणि नंदू मोहरकर हे या सिनेमाचे कला दिग्दर्शक असून अतुल साळवे हे निर्मिती व्यवस्थापक आहेत. संकलन विशाल कोटकर आणि सोनू पैठणकर यांनी केले आहे.
केवळ मुलांच्या मानसिकतेवर सिनेमा काढण्यापेक्षा समाजात जे ज्वलंत चित्र आज पाहायला मिळते त्याचे वास्तववादी चित्रण ‘गोप्या’ सिनेमाद्वारे केले असून कलाकार-तंत्रज्ञांची चांगली भट्टी जमल्याने एक दर्जेदार आशयघन कलाकृती रसिक दरबारी सादर करण्याचा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक राजपैठणकर यांनी सांगितले.