स्टार प्रवाहावरील मालिकेत रंजक वळण
स्त्रियांचे निर्णय स्त्रियांच्या हाती असा वेगळा विचार मांडणाऱ्या आणि लोकप्रिय ठरलेल्या ‘गोठ’ या मालिकेत आता महत्त्वाचं वळण येणार आहे.

गावातल्या उत्सवात राधा शिरोडकर बेभान नाचत असते. उत्सवाला आलेले म्हापसेकर कुटुंबीय राधाचा नाच पहात असतात. राधाच्या नाचावर बसल्या बसल्या ताल धरलेल्या अभयच्या पत्नीला राधा अचानकपणे नाचायला घेऊन जाते. घरातल्या स्त्रीनं सर्वांपुढे नाचायला म्हापसेकरांच्या घरात परवानगी नसते. त्यामुळे राधाच्या या वागण्याचा म्हापसेकरांना राग येतो आणि राधाचा अपमान केला जातो. राधा या अपमानाला कसं उत्तर देते, अभयची पत्नी सर्वांपुढे नाचल्यामुळे म्हापसेकरांच्या घरात काय वादळ येतं, अभयच्या पत्नीला काय शिक्षा केली जाते, हे सगळं या महाएपिसोडमध्ये दाखवलं जाणार आहे. त्यामुळे रंजक टप्प्यावर आलेल्या गोठ या मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी हा महाएपिसोड पहायलाच हवा.