‘बाई वाड्यावर या’वर मानसी नाईकचा नृत्याविष्कार
भारत गणेशपुरे, सागर कारंडे, अभिजित चव्हाण, अरुण कदम आदी एकापेक्षा एक विनोदवीर असणाऱ्या कलावंतांचा ‘जलसा’ २१ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत दाखल होत आहे.
‘पूर्णपणे विनोदाने भरलेला व विनोदाला वाहिलेला ‘जलसा’त व्हल्गर आणि कंबरेखालच्या विनोदाला पूर्णपणे फाटा देत आम्ही केवळ निखळ विनोदावर भर दिलाय. ही एक कुटुंबासोबत बघता येणारी कॉमेडी फिल्म आहे, ज्यात स्लॅपस्टिक सिचुएशन्सल कॉमेडी जॉनर आहे,’ असे चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष राज सांगतात.
आशुतोष राज, ज्यांनी लंडनमध्ये फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतलंय, यांनीच ‘जलसा’ची कथा लिहिलीय व दिग्दर्शनाबरोबरच प्रमुख भूमिकाही साकारताहेत. एवढच नव्हे तर चित्रपटाची निर्मितीसुद्धा त्यांचीच आहे. विनोदवीरांच्या स्टारकास्टसोबतच गिरीजा जोशी, निखिल वैरागर, शीतल अहिरराव यांच्याही महत्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत.
‘जलसा’ची अजून एक खास बात म्हणजे ‘बाई वाड्यावर या’ हे गाणे. हे गाणे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला वाहिलेली आदरांजली. ‘बाई वाड्यावर या’ हे साधं वाक्य निळू फुलेंच्या तोंडून बाहेर पडल्यावर अजरामर झाले. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा हे गाणे रिलीज करण्यात आले तेव्हापासून ते लोकांनी डोक्यावर घेतले आहे. यू ट्यूबवर आतापर्यंत तीस लाख व्ह्यूज मिळवले आहेत व दिवसेंदिवस ही संख्या फुगतच चाललीय. निळूभाऊंच्या ट्रिब्युट गाण्याला सात सूरात बांधलंय समीर साप्तीस्करांनी. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केलंय राजेश बिडवे यांनी आणि महाराष्ट्राची नृत्यबिजली मानसी नाईकने आपल्या नृत्य-अदाकारीने गाण्याला चार चांद लावलेत. गणेशोत्सवात धुमाकूळ घालून या गाण्याने नवरात्रीतही धूम केली आहे.