प्रतिष्ठेच्या एकांकिका स्पर्धेची १५ ऑक्टोबरला अंतिम फेरी
एकाच विषयावर अनेक आविष्कार सादर करण्याची प्रेरणा देणारी प्रतिष्ठित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही एकांकिका स्पर्धा. यावर्षी आघाडीच्या कथाकार मेघना पेठे यांनी सुचवलेल्या विषयावर प्राथमिक फेरी झाली. आता या स्पर्धेच्या अंतिम फेरीवर नाट्यसृष्टीची नजर खिळली असून, शनिवारी, १५ ऑक्टोबरला सकाळी ११.३० वाजतापासून सर्वोत्तम पाच एकांकिका माटुंगा येथील यशवंतराव नाट्यसंकुलात सादर होणार आहेत.


प्राथमिक फेरीचे परीक्षण नीळकंठ कदम, ज्ञानेश्वर मर्गज, रवींद्र लाखे आणि गिरीश पतके या मान्यवरांनी केले. यातून निवडलेल्या पाच एकांकिकांची अंतिम फेरी शनिवारी पंधरा ऑक्टोबरला सकाळी साडेअकरा वाजल्यापासून माटुंगा इथल्या यशवंतराव नाट्यसंकुलात संपन्न होईल.
रंगभूमीच्या अभिवृद्धीसाठी या स्पर्धेचे संयुक्तपणे आयोजन करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदने घेतला आहे. त्यानुसार स्पर्धेची अंतिम फेरी परिषदेच्या माहीम इथल्या यशवंतराव नाट्यसंकुलात होत आहे.
स्पर्धेत सादर होणारे पाच आविष्कार
प्रवेश मुंबई निर्मित, भाग्यश्री पाणे लिखित संदेश जाधव दिग्दर्शित ‘प्रारंभ’, इंद्रधनू मुंबई निर्मित सुनील हरिश्चंद्र लिखित आणि सुनील, गौरव, निलेश, विपुल दिग्दर्शित विभवांतर, समर्थ अकादमी पुणे निर्मित विशाल कदम लिखित राहुल बेलापूरकर दिग्दर्शित सेकंडहँड, अंतरंग थिएटर निर्मित रोहन पेडणेकर लिखित-दिग्दर्शित आस्वल आणि फिनिक्स, मुंबई निर्मित स्वप्नील चव्हाण लिखित अजित सावंत -स्वप्नील टकले दिग्दर्शित मयसभा या पाच वेगवेगळ्या अभिव्यक्तीच्या एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या असून त्यातल्या मान्यवर अभिनेता – तंत्रज्ञांमुळे यंदाच्या कल्पना एकची अंतिम फेरी चुरशीची ठरणार आहे.