२० ऑक्टोबरला येतेय नाट्यरसिकांच्या भेटीला
जागतिक रंगभूमीवर अजरामर झालेल्या काही नाट्यकृती नेहमीच संवेदनशील नाट्यकर्मींना खुणावत असतात. त्यातलीच एक कलाकृती म्हणजे ‘किमयागार’. प्रसिद्ध लेखिका, निवेदिका, नाट्यदिग्दर्शक आणि कलावंत संपदा जोगळेकर-कुळकर्णी दुसऱ्यांदा या ‘किमयागार’च्या प्रेमात पडल्या असून, त्यांच्या दिग्दर्शनात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २० ऑक्टोबरला होत आहे.
अमेरिकेतील उत्तम वक्ता, लेखक आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध झालेल्या हेलन केलर यांच्या ‘द स्टोरी ऑफ माय लाईफ’ या आत्मचरित्रावर आधारित ‘द मिरॅकल वर्कर’ हे नाटक अमेरिकन नाट्यसृष्टी गाजविणारे ठरले. १९९३ साली या कथेचे वि.वा.शिरवाडकर आणि सदाशिव अमरापूरकर या दोन साहित्यकारांनी मराठीकरण केले आणि त्या नाटकाला ‘किमयागार’ असे नाव देण्यात आले.
संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी ‘किमयागार’ हे नाटक २०१४ला मराठी रंगभूमीवर आणले होते. आता दोन वर्षांनी पुन्हा संपदा यांच्या दिग्दर्शनात स्वरानंद आणि व्हि. आर. प्रोडक्शनच्या सहयोगाने हे नाटक पुन्हा रंगमंचावर येत आहे.
‘किमयागार’ हे नाटक १८८७ च्या काळातील हेलन केलर या अंध – मूकबधीर लहान मुलीच्या जीवनावर आधारित आहे. जी मोठेपणी अमेरिकेतील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नावारूपाला आली. एक अंध-मूकबधीर लहान मुलगी आणि तिला तिच्या प्रगतीमध्ये सर्वार्थाने सहाय्य करणारी तिची अॅनी सुलेवान ही शिक्षिका या दोन व्यक्तिरेखा या नाटकाचा केंद्रबिंदू आहेत. अॅनी सुलेवान यांनी छोट्या हेलनला स्पर्शाद्वारे करून दिलेली शब्दांची आणि जगाची ओळख, अॅनी सुलेवान यांचा निश्चय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केवळ १४ दिवसात चिडचिड्या झालेल्या हेलनला सर्व क्षमतेवर उत्तम बनविणे, हे सारे या नाटकाद्वारे रसिकांसमोर येते,” असे किमयागार’च्या दिग्दर्शिका आणि अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी सांगितले.
पुढे त्या असेही म्हणतात की, ‘कथाभाग जुना असला तरीही हे नाटक २०व्या शतकाचे प्रतिनिधित्वदेखील करते. सध्याच्या यांत्रिक युगात अपंगत्व असलेल्या मुलाला जसा संघर्ष करावा लागतो, तसाच तो इतर मुलांनादेखील करावा लागत आहे. त्यामुळे या नाटकामुळे पालक आणि मूले दोघांनादेखील त्यांच्या प्रवासात वाटचाल करण्यासाठी एक नवी दिशा नक्कीच सापडेल.’
परिक्षित भातखंडे यांनी नाटकाला त्या काळाला आणि प्रसंगाला साजेसे संगीत दिले आहे. योगेश केळकर यांनी नाटकात वातावरण निर्माण होईल अशा रंगछटा वापरल्या आहेत. नाटकाचा काळ १८व्या शतकातील असल्याने नेपथ्यदेखील तो ढंग घेऊन साकारले आहेत.
“१९ व्या शतकात मराठी रंगभूमीवर आलेल्या या नाटकात १३ पात्रे होती. शिवाय त्यावेळी हे नाटक पावणेचार तासाचे होते. परंतु सध्या राहणीमानाला आलेल्या गतीनुसार, नाटकाचा कालावधीदेखील कमी करण्यात आला आहे. त्यानुसार हे नाटक २०१४ च्या प्रयोगापासून २ तास १० मिनिटे एवढ्या कालावधीचे करण्यात आले आहे. पात्रेदेखील कमी करण्यात आली आहेत”, असे दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी सांगितले आहे.
मुंबईतील तरुणांचा ग्रुप असलेल्या स्वरानंद आणि व्हि.आर.प्रॅाडक्शन निर्मित हे नाटक पुन्हा मराठी रंगमंचचावर आणण्यात मोठा वाटा आहे. यामध्ये हर्षदा शिंदे, स्वरा सुब्रमणियन-शिंदे, संदीप सावंत, हेमंत धुरी यांचा समावेश आहे.
२० ऑक्टोबर २०१६ ला या नाटकाचा शुभारंभ होणार आहे. “किमयागार हे असे कथानक आहे की ते पुन्हा पुन्हा रंगमंचावर आले तरी प्रेक्षकांना त्याचा ताजा अनुभव नक्कीच घेता येईल. आम्हाला खूप आनंद आहे की हे नाटक पुन्हा रंगमंच्यावर येण्यात आम्ही या निर्मितीचा एक भाग आहोत. ह्या नाटकाचा २० ऑक्टोबरला शुभारंभाचा प्रयोज झाल्यानंतर इंदोरमध्ये २२ आणि २३ ऑक्टोबरला होणार आहे. शिवाय प्रीमियरसोबत याचे ५ प्रयोग निश्चित झाले आहेत”, असे स्वरानंदचे संस्थापक हर्षदा शिंदे यांनी सांगितले.
स्वरानंदचे हे पहिलेच नाटक आहे. या नाटकाची घोषणा अलीकडेच करण्यात आली, त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्यासह अभिनेत्री किशोरी गोडबोले पस्थित होत्या.
नाटकाच्या दिग्दर्शिका आणि नाटकात अॅनी सुलेवानची भूमिका साकारणाऱ्या संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी असे सांगितले की, ‘नाट्यसंपदा या संस्थेने ज्या नाटकापासून सुरुवात केली, त्या नाटकापासून स्वरानंदचीदेखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यावेळी जसे हे नाटक लोकांच्या मनात घर करून राहिले, तसेच यावेळी देखील हे नाटक लोकांना खिळवून ठेवेल.
कलावंत आणि भूमिका
संपदा जोगळेकर-कुळकर्णी (Ms. Annie Sullivaan),
अंगद म्हसकर (Mr. Keller),
पल्लवी वाघ – केळकर / रेणूका भिडे (Mrs. Keller),
तेजस डोंगरे (Brother),
अनय पाटील (Friend),
तृष्णिका शिंदे (Helan Keller),
वैजयंती शिंदे (Made)