सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कलाकारांचा गौरव
विविध लोककलेच्या मान्यवर कलावंतांचा गौरव ४ मार्चला समारंभपूर्वक करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात लोककलेला सर्वार्थाने राजाश्रय देणे, सरकारचे कर्तव्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राची ओळख असलेले लोककलेचे वैभव फार मोठे आहे. या लोककलेचे जतन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे लोककला टिकविण्याचे आणि लोक कलाकारालाही जोपासण्याचे काम आम्ही करु, असे सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ४ मार्चला काढले.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या २०१६च्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे वितरण रविंद्र नाट्य मंदिराच्या कलांगणात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
तावडे म्हणाले की, लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. परंतु हे लोककलेची वास्तव सध्या कमी प्रमाणात रसिकांसमोर येत आहे. त्यामुळे लोप न पावता या ऐतिहासिक लोककलाचे जतन करण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. हे काम आत जवळ जवळ 65 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे युवा पिढीला लोककला म्हणजे काय आणि त्या लोककलेचे महत्व या जतनाच्या कामातून कळू शकेल, असा विश्वास तावडे यानी व्यक्त केला.
लोककला ही जनमानसात लोकप्रिय असली तरीही अन्य कलेप्रमाणे या लोककलेचा सुयोग्य अभ्यासक्रम दिसत नाही. त्यामुळे लोककला शिकविण्याच्यादृष्टीने नजिकच्या काळात लोककलेचा योग्य अभ्यासक्रम तयार करता येईल का? व हा अभ्यासक्रम विविध शिक्षण संस्थामार्फत शिकविता येईल का? याचा विचारही नजिकच्या काळात राज्य सरकार करेल, असेही तावडे यानी सांगितले.
सन २०१६-१७ या वर्षीचे राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे मानकरी. किशोर नांदलस्कर (नाटक), पं. उपेंद्र भट (कंठसंगीत), पं. रमेश कानोले (उपशास्त्रीय संगीत), भालचंद्र कुलकर्णी (मराठी चित्रपट), पांडूरंग जाधव (कीर्तन), मधुकर बांते (तमाशा), शाहीरी इंद्रायणी आत्माराम पाटील (शाहिरी), सुखदेव साठे (नृत्य), भागुजी प्रधान (लोककला), सोनू ढवळू म्हसे (आदिवासी गिरीजन) आणि प्रभाकर भावे (कलादान) यांना शानदार समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार पुरस्कार्थींना त्या त्या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि नामवंत व्यक्तिंच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पर्यटन खात्याचे सचिव वल्सा नायर सिंह उपस्थित होते.
नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन, तमाशा, शाहिर, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरुप रुपये एक लाख रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे आहे. तसेच यावेळी केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे मानकरी मनोज जोशी (अभिनय), हिमानी शिवपूरी (अभिनय), प्रदीप मुळ्ये (प्रायोगिक नाट्यकला), छाया खटेगावकर आणि माया खुटेगावकर (लावणी) या पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. शफाअत खान (नाट्यलेखन) यांच्यावतीने त्यांच्या पत्नी रुक्साना खान यांनी सत्कार स्विकारला.
‘सनी’चा सत्कार
ऑस्कर सोहळ्यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा आणि सांताकृझ कलिना येथील वस्तीत राहणारा सनी पवार या बाल कलाकराला ‘लायन’ या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने “महाराष्ट्राची गौरव गाथा” हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.