‘माचीवरला बुधा’ पहा चित्रपटगृहात!
“सुप्रसिध्द कादंबरीकार कै. गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित ‘माचीवरला बुधा’ या चित्रपटातील बुधाला मी प्रत्यक्ष बघितले आहे. या चित्रपटात बुधा हा तसाच्या तसाच साकारला असून, पक्ष्यांच्या गाण्यासह निसर्गाचे केलेले चित्रण अप्रतिम असल्यामुळेच गो. नी. दांडेकर यांचा संदेश प्रेषकांपर्यंत, आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास ही कलाकृती यशस्वी ठरेल. खऱ्या सुखाचा आनंद घेण्यासाठी तरूणवर्गाने हा चित्रपट अवश्य पाहावा, असे मी सर्वांना आवाहन करतो” असे मत सुप्रसिध्द पक्षी तज्ज्ञ व अरण्यवाचक मारुती चितमपल्ली यांनी या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनावेळी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
निसर्ग, वन्यजीव आणि माणूस यांच्यातील अव्दैत राखणारा आणि निसर्गाबद्दल विलक्षण अनुभूती देणारा ‘माचीवरला बुधा’ हा चित्रपट म्हणजे निसर्गावर भरभरून प्रेम करण्याची प्रेरणा देणारी कलाकृती आहे. हा चित्रपट म्हणजे पशु, पक्षी व प्राणी आणि निसर्ग यांच्या अतुट नात्यांची गुंफण असून त्यामध्ये मुंबईसारख्या शहराच्या गजबजाटाला कंटाळून खऱ्या सुखाच्या शोधात असलेला बुधा राजमाचीवरच्या जंगलात जाऊन निसर्गाची एकरूप होताना दिसतो. बुधाला या निसर्गाच्या सानिध्यात खऱ्या जीवनाचा अर्थ निसर्गामुळेच कळतो. सर्वच अंगांनी परिपूर्ण असलेला हा चित्रपट म्हणजे गो. नी. दांडेकर यांच्या अप्रतिम निसर्गप्रेमाची संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचा दिग्दर्शक विजयदत्त यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
चित्रपटात बुधाची प्रमुख भूमिका सुहास पळशीकर यांनी साकारली असून स्मिता गोंदकर, भगवान पाचोरे, नितीन कुलकर्णी, चंद्रप्रकाश व कृष्णा दत्त यांच्याही भूमिका आहेत.
संगीत धनंजय धुमाळ यांचे, तर पार्श्वसंगीत विजय गावडे यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती दीपिका विजय दत्त यांनी केली असून पटकथा व संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिले आहे.
माचीवरला बुधा या साहित्यकृतीवर फारपूर्वी चित्रपट बनविण्याचा प्रयत्न तत्कालीन नामवंत दिग्दर्शकांनी केला. परंतू त्यांना गोनीदांचे लिखित वर्णन दृश्यरुपात मांडणे शक्य झाले नाही. दिग्दर्शक विजयदत्त यांनी त्याला अतिशय कल्पकतेने उत्तम न्याय दिला आहे. चित्रपट पाहताना लिखित सर्व प्रसंग हुबेहूब उभे केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी, छत्रपती शाहू महाराज आदींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजमाचीवर जाऊन सिनेमा चित्रीत केल्याने निसर्गरम्य सह्याद्रीचे विहंगम दर्शन घडते.
मराठी चित्रपटसृष्टीत माचीवरला बुधा या चित्रपटाच्या निमित्ताने एका नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब निर्मात्या दीपिका विजय दत्त आणि योगिनी आडकर यांनी केला आहे. निर्मात्यांनी व्हीदत्ता या नावाने स्वत:चे सिनेमागृह तिकीट आरक्षण मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲप द्वारे प्रदर्शनापूर्वीच ४२ थिएटर्स हाउसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे प्रदर्शनाआधीच सर्वाधिक शोज् हाऊसफुल्ल होणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. गो. नी. दाण्डेकरांच्या चाहत्यांसाठी, निसर्गप्रेमींसाठी, सिनेमा-साहित्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी आणि मनोरंजना बरोबर निसर्गाचे रसग्रहण करण्यासाठी माचीवरला बुधा हा चित्रपट एक पर्वणी आहे.