कंठीय स्वरांप्रमाणेच निरनिराळ्या वाद्यांतून निघणारे स्वरसंगीतही रसिकांच्या विशेष आवडीचे असते. वाद्यसंगीताची अशीच सुरेल मैफल गाजवणारे मनोहरी सिंह यांनी संगीत क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट व राहुल देव बर्मन टीमचे एक प्रमुख सदस्य असलेल्या ‘मनोहरी दा’ यांची पाश्चिमात्य वाद्यांवरही चांगलीच हुकुमत होती. आपल्या वाद्यांच्या जादूई सुरांनी रसिकांना सुरेल आनंद देणाऱ्या या महान संगीत संयोजकाला मानवंदना देण्यासाठी नवनीत प्रस्तुत ‘इमोर्टल मनोहरी दा’ ही सांगीतिक मैफल रंगणार आहे.
‘इमोर्टल मनोहरी दा’ या मैफीलीचे आयोजन व निर्मिती ऋजुता देशमुख, शिरीष जोशी, नितीन नाईक यांनी केली असून शुक्रवार २८ एप्रिलला सांयकाळी ८.३० वाजता यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे ही मैफल रंगणार आहे. प्रत्येकाची सांगीतिक आवड वेगवेगळी असली तरी विशेषत: हिंदी सिनेमातील संगीताची जादू सहसाओसरत नाही. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या एका पेक्षा एकसरस गाण्यांचा नजराणा या मैफिलीत अनुभवता येणार आहे.
या मैफिलीत आलोक काटदरे व शैलजा सुब्रमण्यम हे गायक तसेच नागेश कोळी (सॅक्सोफोन), मोहित शास्त्री (फ्ल्यूट), चिराग पांचाळ, ओमकार देवस्कर (किबोर्ड), ब्रिजेश शहा (लीड गिटार), मनिष कुलकर्णी (बेस गिटार), सचिन सावंत (कोंगो/ढोलक), निशाद करलगिकर (तबला), दत्ता तावडे (ऑक्टोपॅड व ड्रम), दीपक बोरकर (तालवाद्य), समीत पेडणेकर (तुंबा) हे नामवंत वादक कलाकार सहभागी होणार आहेत आणि आनंद सहस्त्रबुद्धे सूत्रसंचालन व संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
या मैफिलीत महम्मद रफी यांची गाणी एक खास सेलिब्रेटी सादर करणार असून प्रेक्षकांसाठी ते सरप्राइज असणार आहे. एखाद्या गाण्याला वाद्यसंगीताचा परीसस्पर्श कसा होतो हे मनोहरींनी आपल्या मनोहरी सुरांनी अनेक गाण्यांतून दाखवून दिले आहे. संगीत परंपरेतील एक सुरेल पर्व अशी ख्याती असलेल्या ‘सॅक्सोफोनिस्ट ‘‘मनोहरी दा’ यांना सूमधुर गीतांच्या माध्यमातून देण्यात येणारी मानवंदना संगीतप्रेमींसाठी स्मरणरंजनाची अनुभूती असणार आहे. या कार्यक्रमाची तिकीटे यशवंत नाट्य मंदिर येथे सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ८ यावेळेत उपलब्ध होतील. तसेच ‘बुक माय शो’ या वेबसाईटवर सुद्धा ऑंनलाइन बुकिंग करता येईल. अधिक माहितीसाठी शिरीष जोशी ९८२००९२२७७ यांच्याशी संपर्क करावा.