‘मेहफिल ए उमराव जान’चे उत्साहात प्रयोग
महाकवी कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे ‘मेहफिल ए उमराव जान’ हा नव्या दिमाखाचा कार्यक्रम पी-3 मोशन पिक्चरचे राजू हिरवानी आणि आशिष डोनाल्ड यांच्या सहकार्याने २८ फेब्रुवारी, १ आणि २ मार्च रोजी पार पडला.
कला क्षेत्रात नृत्यकलेला महत्वाचे स्थान आहे आणि या नृत्यकलेत कथक या भारतीय नृत्य प्रकाराला आईचे स्थान दिले जाते. या आईच्या उदरातून लावणी आणि मुजरा हे दोन नृत्य प्रकार जन्माला येतात. जो दर्जा भारतीय संस्कृतीमध्ये कथक आणि लावणीला दिला जातो. असाच दर्जा मुजरा या नृत्य प्रकारालासुद्धा दिला गेला पाहिजे. मुजरा म्हंटल्यावर सर्रास लोकांच्या नकारार्थी माना मुरडल्या जातात. परंतु सादरीकरण उत्तम असल्यास कथक, लावणीप्रमाणेच मुजरासुद्धा किती सुंदर आहे हे प्रस्तुत कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये आहे.
एकूण २० मुजरे या कार्यक्रमात वेगवेगळ्या पद्धतीने सादर केले आहेत. या कार्यक्रमाचे संपूर्ण नृत्य दिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले आहे. सुरुवातीलाच मोहें पनघट पे नंदलाल या मुजऱ्याने होते तर सनम तुम बेवफा, तोफा कबूल अशा परिचित मुजऱ्यांवर नृत्य सादर केला गेले व शेवट मेरे डोलना ह्या गाण्यावर जुगलबंदीच्या स्वरूपात आशिष पाटील यांनी सादर केले.
या कार्यक्रमाचे आणखी विशेष म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला वेगळा स्टेज सेटअप तयार केला जातो. लाईव्ह म्युजिक आणि गाणी गायली जातात. मराठी कलाकारांमध्ये सुकन्या काळंण, ऋतुजा जुन्नरकर आणि आशिष पाटील यांच्या समवेत नवोदित कलाकारांचा समावेश आहे.
‘मेहफिल ए उमराव जान’ ह्याचा पुढील कार्यक्रम कलकत्ता येथे होणार असून भारताप्रमाणेच इतर ठिकाणीसुद्धा लवकरच करणार आहोत असे पी-3 मोशन पिक्चरचे राजू हिरवानी यांनी सांगितले.
नृत्यदिग्दर्शकांनी अशा प्रकारचे नृत्यदिग्दर्शन करून नृत्यक्षेत्राप्रमाणेच भारतीय संस्कृतीतही नव्याने बदल घडवून येण्याची जबाबदारी घ्यावी असे नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांनी सांगितले.