पारंपरिक वाद्य आणि परदेशी वाद्यांची जुगलबंदी
सूर-तालाचं अद्भुत विश्व अनुभवण्याची पर्वणी ठाणेकरांना १० डिसेंबर रोजी मिळणार आहे. परदेशी वाद्य आणि पारंपरिक वाद्यांची जुगलबंदी, व्हायोलिनच्या सुरांचा मिलाफ असलेला ‘द वर्ल्ड ऑफ म्युझिक’ हा कार्यक्रम दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सायंकाळी ५.३०वाजता होणार आहे. स्कॅन एंटरटेन या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सारेगमप या कार्यक्रमातील प्रसिद्ध कलाकारांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. निलेश परब यांच्यासह संगीत संयोजक कमलेश भडकमकर, बासरीवादक अमर ओक, बासरीवादक वरद कठापुरकर, ढोलकीवादक कृष्णा घोटकर, व्हायोलिनवादक सुरेश लालवाणी, व्हायोलिनवादक श्रुती भावे, मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी, दत्ता तावडे, तबलावादक मंदार गोगटे आणि आर्चिस लेले यांचा त्यात समावेश आहे. तसंच डोंबिवलीतील तरूण ढोलवादकांचं पथक आणि चेन्नईचा २० व्हायोलिन वादकांचा चमू या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
या कार्यक्रमातील संगीत रचना आणि संयोजन कमलेश भडकमकर यांच्या आहेत. दोन तासाच्या या संगीत मैफलीत रसिकांना संगीताच्या अद्भुत विश्वाचा आनंद घेता येणार आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
तालवाद्यांच्या क्षेत्रात निलेश परब यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. निलेशच्या संकल्पनेतून या तालवाद्यांची अनोखी सफर ‘द वर्ल्ड ऑफ म्युझिक’ या संगीत मैफलीद्वारे घडणार आहे. विविध प्रकारची आफ्रिकन वाद्य, मराठमोळी पारंपरिक वाद्य आणि व्हायोलिन, पियानो असा वेगळा माहौल या कार्यक्रमातून निर्माण केला जाणार आहे. ३५-४० ढोल एकावेळी संगीताच्या कार्यक्रमात मंचावर वाजवले जाण्याचा दुर्मिळ योग या निमित्तानं जुळून येणार आहे.
२० व्हायोलिन वादक एकावेळी मंचावर असणं हे अलिकडे पहायला मिळत नाही. ही उणीवही या कार्यक्रमातून भरून निघणार आहे. त्यामुळे कोणत्याही भाषेच्या पलिकडे जाऊन संगीताच्या अद्भुत विश्वाची सफर रसिकांना घडेल.या आगळ्या संगीतमैफिलीची तिकीट बुकमायशो या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.