छोटयांनी मोठ्यांसाठी केलेलं बालनाट्य
आजच्या विज्ञान युगात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण आधुनिक तंत्रज्ञानात गुंतले आहेत. मुलं आणि तरुणाई इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली आहेत. अशा वेळी आपली भावी पिढी नेमकी कुठे चालली, हाच आशय घेऊन ‘माय आयडॉल डॉ. अब्दुल कलाम’ हे बालनाट्य रंगमंचावर येत आहे.
आजवर ५० च्यावर बालनाट्य सादर करणारे लेखक – दिग्दर्शक रमेश वारंग यांचे हे आगळं वेगळं बालनाट्य असून, नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
रमेश वारंग डान्स ड्रामा स्कूल प्रस्तुत, श्री महाकाली चित्र, सिद्धांत प्रॉडक्शन आणि अर्चना थिएटर्स या बॅनरखाली निर्माती कांता कोठारे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. लेखन, दिग्दर्शन आणि संकल्पना रमेश वारंग यांची आहे. विशेष सहकार्य सुधाकर नार्वेकर यांचे आहे.
छोटयांनी मोठ्यांसाठी केलेल्या या बालनाट्यात साई खरटमोल, तेजस थोरात, नहूष फडके, सागर मुचकेल, ईशान्त कापडणे, गार्गी वैद्य, स्नेहा मालखेडे, साईराज बेलोसे, शुभम हिंदळेकर, अनिरुद्ध सूर्यवंशी, श्रावस्ती कांबळे, प्राची डोंगरे, सायली करुळकर, रविंद्र जाधव यांच्या भूमिका असून सुत्रधार शेखर दाते आहेत.
‘माय आयडॉल डॉ. अब्दुल कलाम’ या नाटकात नेहेमीच अपयशी ठरणार्या चार मुलांची कथा रंगवली आहे. योगायोगाने ते डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र वाचतात आणि त्यांच्या विचाराने झपाटून जातात. त्यांचे विचार अंमलात आणतात आणि नेहेमी अपयशी होणारी ही चारही मुलं प्रत्येक ठिकाणी यश मिळवतात. आपल्या यशाचं रहस्य सर्वांना माहीत होण्यासाठी ते त्यांच्या कामाची चित्रफीत बनवतात. त्यांची इच्छा असते की ही चित्रफीत सर्वांनी पहावी व त्यापासून प्रेरणा घ्यावी. त्यांची ही इच्छा पूर्ण होते का? या प्रश्नाचे उत्तर या नाटकातच बघायला हवे.
आत्ताच्या व्हाट्सअप आणि फेसबूकच्या युगात मुलं अभ्यासाकडे, ध्येयाकडे दुर्लक्ष करू लागली आहेत. त्यांच्यासाठी ही नाट्यकृती प्रेरणा देणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे केवळ दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुट्टीपुरतं मर्यादित हे नाटक नसून याचे प्रयोग अव्याहतपणे करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे.