निलेश परब यांची खास मुलाखत
‘सारेगमप’ या कार्यक्रमातून वाद्यवादक निलेश परब सर्वांच्या परिचयाचा झाला. आता निलेश एका वेगळ्या रुपात संगीतप्रेमीपुढे येतोय. त्याच्या संकल्पनेतून साकारलेला ‘द वर्ल्ड ऑफ म्युझिक’ हा कॉन्सर्ट शनिवारी १० डिसेंबर रोजी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होतोय. या निमित्तानं निलेशशी साधलेला संवाद…
वाद्यांचा कॉन्सर्ट का करावासा वाटला?
– आपल्याकडे किंवा परदेशातही कॉन्सर्ट अनेक होतात. मात्र, फक्त वाद्यांचा असा कॉन्सर्ट होत नाही. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं संगीत तसेच वाद्यांना सहज स्वीकारलं जातं. भारतात असंख्य प्रकारची वाद्य आहेत. परदेशातली वाद्य भारतीय संगीतात सहज मिसळून जातात. त्यामुळे वाद्य संगीतावर आधारित कॉन्सर्ट करावा असं बऱ्याच वर्षांपासून डोक्यात होतं. जगभरातली विविध प्रकारची वाद्य आणि नव्या रचनांचा हा कॉन्सर्ट आहेत. माझ्या आणि कमलेश भडकमकरच्या रचना या कॉन्सर्टमध्ये आहेत.
द वर्ल्ड ऑफ म्युझिकचं वेगळेपण काय?
संगीत हे एक विश्व आहे. त्या विश्वाचा आपल्या भारतीय संगीताच्या पद्धतीनं केलेला हा एक विचार आहे. वाद्यांनी एकमेकांच्या हातात हात घातल्यावर काय परिणाम साधला जाऊ शकतो हे दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. आम्ही सर्व वादक चित्रपट संगीत वाजवणारे आहोत. चित्रपट संगीत टीमवर्कनेच साकारतं. चित्रपटाचं संगीत करण्याची प्रोसेस मंचावर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. कॉन्सर्ट म्हटल्यावर आपल्याला गाणी ऐकण्याची सवय आहे. आम्ही थोडी रिस्क घेऊन पूर्ण नव्या रचना घेऊन येत आहोत. या रचना कुठेही रेकॉर्ड झालेल्या नाहीत. फक्त वाद्य संगीताचा विचार करून केलेल्या या रचना आहेत. प्रत्येकाला एंजॉय करता येईल असं हे संगीत आहे. यात ढोलांची आणि परदेशी वाद्यांची जुगलबंदी आहे. व्हायोलिनचा मोठा चमू आहे. भारतीय आणि परदेशी वाद्यांचा संच आहे. मात्र, हा फ्युजनचा कॉन्सर्ट नाही. साऊंडचा वेगळा अनुभव संगीतप्रेमींना अनुभवता येईल.
तुझी संगीत रचना करण्याची प्रोसेस कशी होती?
– संगीत रचना सर्वांनाच करता येतात असं नाही. त्यामुळे तालवाद्य वादकांनी केलेल्या रचनांची उदाहरणं फार नाहीत. मीही ठरवून रचना केलेल्या नाहीत. जेव्हा काही सुचलं, तेव्हा ते मोबाईलमध्ये नोंदवून ठेवलं. संगीत रचना करणं हे माझं काम नाही, हे मला माहीत आहे. मात्र, संगीताबाबत काहीतरी विचार करताना जे सुचलं ते नोंदवलं. वाद्यांच्या दृष्टिकोनातून केलेल्या या रचना आहेत. कमलेश भडकमकरला ऐकवलं. त्यातलं चांगलं त्यानं निवडलं.
वाद्य संगीताचे कॉन्सर्ट सातत्याने होत रहावेत असं वाटतं का ? त्यातून वेगळं संगीत निर्माण होईल का?
– वेगळ्या प्रकारचं संगीत हाच या कॉन्सर्टचा मुख्य विचार होता. मला एक कार्यक्रम करून थांबायचं नाहीये. लोकांचा संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला पाहिजे. वाद्य संगीतात प्रयोग खूप झाले. मात्र, साथसंगत करणारे कलाकार एकत्र येऊन काय वेगळं करू शकतात हे दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. स्कॅन एंटरटेन आमच्या पाठीशी उभे राहिल्यानं हा कॉन्सर्ट शक्य झाला आहे. या पुढेही अशा प्रकारचे कॉन्सर्ट नक्कीच होत राहिले पाहिजेत.