आशुतोष पत्कीचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
वंशिका क्रिएशनसोबत सहनिर्माते विष्णू मनोहर यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट वन्स मोअर या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. फिल्म सिटी, मुंबईसोबत गोव्यातही चित्रीकरण करण्यात येणार आहे.
वन्स मोअर हा मराठीतील पहिलाच सिनेमा आहे ज्यात, जास्तीत जास्त वि एफ एक्स तसेच ग्राफिक्स वापरले जाणार आहे. वन्स मोअर हा चित्रपट मराठीतील बाहुबली होईल की काय, अशी चर्चा फिल्म च्या मुहूर्तापासूनच फिल्म सृष्टीत सुरु झाली आहे. हा सिनेमा ‘कर्म’ या विषयावर भाष्य करणार आहे.
सदर सिनेमाची कथा प्रसिद्ध मालिका लेखिका कालाय तसमाय नमः फेम लेखिका श्वेता बिडकर यांनी लिहिली आहे. अभिनेते नरेश बिडकर यांच्या दिग्दर्शनात ‘वन्स मोअर’ साकारला जात आहे. छोट्या छोट्या गोष्टींची शहानिशा केल्यानंतरच आम्ही शूटिंगसाठी येण्याचा माझा आग्रह होता, असे त्यांनी सांगितले.
वन्स मोअर द्वारे जेष्ठ संगीतकार ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या चालींनी वेळ लावलंय असे पं. अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्कीचे मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य नायक म्हणून पदार्पण होत आहे. राजबिंडे असे रूप असणारा आशुतोष या सिनेमाद्वारे पदार्पण करीत असून, त्याला तेवढ्याच तोलामोलाची साथ देण्यासाठी, आपल्या नृत्याने अवघ्या महाराष्ट्राची मन जिंकणारी अभिनेत्री व नृत्यांगना धनश्री पाटीलसुद्धा या चित्रपटाद्वारे आपले पदार्पण करित आहे.
वन्स मोअरचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या सिनेमाचे सहनिर्माते असून त्यांची ही एक महत्वाची भूमिका या सिनेमात असणार आहे.
जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, भारत गणेशपुरे, पौर्णिमा तळवलकर व दिग्दर्शक नरेश बिडकर यांच्याही या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत.
जोधा अकबर, चेन्नई एक्सप्रेस सारख्या बॉलिवूडपटांचे नृत्य दिग्दर्शक चिन्नी प्रकाशजी यांच्याकडे नृत्यदिग्दर्शन, संजय सिंग यांना छाया दिग्दर्शनाची जबाबदारी दिली आहे. शैलेंद्र बर्वे संगीतदिग्दर्शन करणार आहेत. ‘दगडी चाळ’सारख्या सुपर डुपर हिट सिनेमाच्या वेशभूषकार चैत्राली डोंगरे ह्यांच्यावर वेशभूषेची जबाबदारी आहे.
वन्स मोअर चे संकलन अग्निपथ, दिल हैं कि मानता नही’सारख्या सुपर हिट सिनेमाचे संकलक डिंपी बहल करणार आहेत. देवदास भंडारी हे जेष्ठ कला दिग्दर्शक असून, या अनुभवी कलावंत आणि तंत्रज्ञ या सिनेमाचे बलस्थान असतील, असा विश्वास दिग्दर्शक नरेश बिडकर यांनी व्यक्त केला.