‘गोंद्या आणि कमुचा फार्स’ व्दितीय, ‘भगदाड’ तृतीय
अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेने आयोजित केलेल्या ज्येष्ठ नाटककार वसंत जाधव स्मरणार्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत अहमदनगर येथील मल्हार रंगमंचची ‘माईक’ सर्वोत्कृष्ट ठरली. चंद्रपूच्या नवोदिताचे ‘गोंद्या आणि कमुचा फार्स’ला व्दितीय आणि मुंबईच्या एम.जी.के.एम. कलामंचच्या ‘भगदाड’ या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला.
या स्पर्धेची अंतिम फेरी १५ व १६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात संपन्न झाली. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, इचलकरंजी आणि जळगांव केंद्रातून एकूण ६५ एकांकिका सादर झाल्या. यातून १३ एकांकिका अंतिम फेरीत सादर झाल्या.
लेखन, दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक संदीप दंडवते, अहमदनगर यांना तर पुरूष अभिनय प्रथम कृष्णा वाळके, संकेत जगदाळे, विराज आयचित्ते यांना प्रदान करण्यात आले. स्त्री अभिनय प्रथम सोनाली मगर, कल्याण यांना मिळाले.
नाटयसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाटयपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, सविता मालपेकर, प्रकाश बुद्धीसागर, संजय क्षेमकल्याणी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षण अशोक समेळ, महेंद्र तेरेदेसाई आणि लीना भागवत यांनी केले. ७, ८ व ९ एप्रिल रोजी उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९७ व्या नाटय संमेलनात या तीन एकांकिका सादर होणार असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले. प्रस्ताविक व सूत्रसंचालन सहकार्यवाह सतीश लोटके यांनी केले, तर शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.