ऑडियो रेकॉर्डिस्ट ते संगीतकार
‘काटे’, ‘राजू चाचा’, ‘कभी ख़ुशी कभी गम’ तसेच ‘यादें’ यांसारख्या बॉलीवूडच्या नावाजलेल्या सिनेमासाठी ऑडियो रेकॉर्डिस्ट म्हणून काम करणारा प्रफुल्ल कार्लेकर विक्रम फडणीस यांच्या आगामी ‘हृदयांतर’ या सिनेमाच्या माध्यमातून संगीत दिग्दर्शन करणार आहे,
सिनेमातल्या त्याच्या गाण्याविषयी बोलायला गेलो, तर प्रफुल्लच्या प्रदीर्घ कामगिरीची यादीच आपल्याला पाहायला मिळते. म्युझिक अरेंजर म्हणून आपल्या म्युझिकल करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रफुल्लने हिंदीत चांगलाच जम बसवला आहे.
करिअरच्या सुरुवातीलाच प्रफुल्लला नाना पाटेकर, अक्षय कुमार आणि अनिल कपूर यांच्या गाजलेल्या ‘वेलकम’ या बॉलिवूड सिनेमातील ‘तेरा सराफा’, ‘होंठ रसीले’ या दोन गाण्यांसाठी म्युजिक अरेंजर आणि प्रोग्रामर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. संगीतवेड्या प्रफुल्लने देखील या संधीचे सोने करत स्वतःला सिद्ध केले. त्यानंतर धुनकी’ (मेरे ब्रदर की दुल्हन), ‘सैयां’ (गुंडे), ‘जिया मेरा जिया’ (गुंडे), ‘आशिक तेरा’ (हॅप्पी भाग जायेगी’) अश्या अनेक हिंदी गाण्यांसाठी त्याने काम केले. त्याच्या या यशस्वी घोडदौडीमध्ये ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमामधील माधुरीवर आधारलेले ‘घागरा’ गाण्याचा देखील यात समावेश होतो. अशाप्रकारे हिंदीतील दर्जेदार गाण्यांमध्ये महत्वाचा वाटा उचलणाऱ्या प्रफुल्लने मराठीतदेखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ हा सुपरहिट सिनेमा प्रफुल्लच्या कारकिर्दीतला माईल स्टोन ठरला. या सिनेमातलं आदर्श शिंदे याच्या आवाजातले ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे मंदार चोळकर लिखित तसेच अमितराज दिग्दर्शित या गाण्यापासून मराठी सिनेसृष्टीत प्रफुल्लने आपले पहिले पाऊल टाकले. यातही प्रफुल्लने हिंदीसारखी कामगिरी करत आपल्या करिअरचा ग्राफ उंचावत नेला.
‘आवाज वाढव डीजे’ (पोश्टर गर्ल), ‘गुलाबाची कळी’ (तू ही रे), ‘मोरया’ (दगडी चाळ) या गाण्यांसाठी त्याने म्युझिक अरेंजर म्हणून काम केले आहे, तसेच ‘गुरु’ या अंकुश चौधरीच्या गाजलेल्या सिनेमातील ‘आत्ता लढायचे’ या गाण्याचे दिग्दर्शनदेखील प्रफुल्लने केले. संगीतजगतातली त्याची ही दरमजल आजही तशीच कायम आहे.
स्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून प्रफुल्लने “वाजलाचं पाहिजे” आणि “तालीम” या सिनेमांना संगीत दिलं आहे, त्याचप्रमाणे नेहा राजपाल यांच्या फोटोकॉपी सिनेमातल्या “मोरा पिया” या गाण्यालासुद्धा प्रफुल्लचे संगीत लाभलं आहे. सिनेमातल्या गाण्यांविषयी बोलायचं झालं तर अनेक नावाजलेल्या गाण्यांना रसिक त्याच्या नावाने आणि गायकांमुळे ओळखतात. मात्र हे गाणं घडवण्यामागे जितकी मेहनत गीतकाराची- गायकाची असते, तितकीच मेहनत त्या गाण्याला दिशा देणा-या ऑडिओ आणि म्युझिक अरेंजरचीदेखील असते.
याबद्दल आपले मत मांडताना प्रफुल्ल अगदी समाधानकारक उत्तर देतो की, मी माझ्या नावाने नाही तर, कामाने लोकांपर्यत पोहोचतो. जेव्हा लोकांना गाणी आवडतात तेव्हा त्याची पोचपावती मला आपसूकच मिळते.
प्रफुल्ल कार्लेकर विक्रम फडणीस यांच्या आगामी ‘हृदयांतर’ या सिनेमाच्या माध्यमातून संगीत दिग्दर्शन करणार आहे,