कॉर्पोरेट जगतातील वेगळा विषय रंगमंचावर
‘कळत नकळत’ आणि नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या नाटकानंतर जॉय कलामंचचे तिसरे नाटक ‘Queen मेकर’ १६ एप्रिलला रंगमंचावर येते आहे.
एकाच वर्षाच्या कमी कालावधीत जॉय कलामंचच्या जॉय भोसले यांनी निर्मिलेलं हे तिसरं नाटक आहे.
आता ‘Queen मेकर’च्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील आणखी एक वेगळा विषय रंगमंचावर सादर केला जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक आणि प्रकाश संयोजक म्हणून ख्यातीप्राप्त असलेले राजन ताम्हाणे यांनी जॉय कलामंच निर्मित ‘Queen मेकर’ या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे.
आजतागायत तब्बल ३७ व्यावसायिक नाटकांचं दिग्दर्शन, १०० हुन अधिक नाटकांचे प्रकाशयोजनाकार आणि स्वतः एक कसलेले अभिनेते असलेले राजन ताम्हाणे यांच्याकडून ‘प्रपोजल’च्या नेत्रदिपक यशानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, ‘Queen मेकर’च्या पदार्पणातून त्यांचं कसदार दिग्दर्शन पुन्हा एकदा आपल्याला पहायला मिळणार आहे.
‘Queen मेकर’ हे नाटक युवा पिढीच्या मूळ प्रश्नाला हात घालणारं आहे. आजची पिढी लग्न करायला तयार झाली तर त्यामध्ये बऱ्याच अटी असतात. यामधील काही अटी एकमेकांना पूर्णपणे पटत नसल्या तरी त्यावेळेची गरज म्हणून हा पर्याय ते स्वीकारतात. काळानुसार ही अट बायकोला बदलावीशी वाटते आणि काडीमोड होतो. त्यानंतर तो दुसरं लग्न करतानाही आपली तीच अट कायम ठेवतो. ही अट नेमकी कोणती आणि नाटकात पुढे काय होतं, हे काही दिवसांत नाटक रंगभूमीवर आल्यावरच समजू शकेल.
हे नाटक म्हणजे आजच्या कॉर्पोरेट जगतातील पुरुषप्रधान वृत्तीवर बोट ठेवणारा एक आगळावेगळा प्रयोग आहे. या नाटकातील प्रमुख भूमिकांमध्ये अक्षर कोठारी, शीतल क्षीरसागर, अंकिता पनवेलकर, अमित गुहेसोबतच एका खास भूमिकेत बाल कलाकार इलिना शेंडे दिसणार आहेत. अक्षर कोठारी प्रथमच या व्यावसायिक नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. सध्या सुरू असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘चाहूल’ या मालिकेतील त्याची भूमिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
अभिनेत्री शीतल क्षीरसागर यापूर्वी अनेक चित्रपट ‘दूर्वा’ व ‘का रे दुरावा’ ही मालिका तसेच ‘तिन्हीसांज’ नाटकाच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकली आहे. तर ‘असं सासर सुरेख बाई’ फेम अंकिता पनवेलकर एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या नाटकात काम करणारी चिमुरडी इलिना शेंडे जेष्ठ अभिनेते सुनिल शेंडे यांची नात आहे. निश्चितच इलिना शेंडे या नाटकाचं खास आकर्षण ठरेल.
‘Queen मेकर’ची कथा लेखक रवि भगवते यांची असून, प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य लाभलं आहे. नाटकाचं संगीत परिक्षित भातखंडे व प्रकाशयोजना राजन ताम्हाणे, वेशभूषा कुहू भोसले, रंगभूषा शरद सावंत, व्यवस्थापक ओमकार पनवेलकर तर सूत्रधार गोट्या सावंत आहेत. अशा या ‘Queen मेकर’चा शुभारंभाचाप्रयोग येत्या रविवारी दि. १६ एप्रिल, २०१७ रोजी दुपारी ४ वाजता दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे पार पडणार आहे.