पटियाला घराण्याचा उदयोन्मुख कलाकार रमाकांत गायकवाड ‘सूरसागर’ या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आपली कला सादर करणार आहे. त्याच्यासोबत तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर आणि संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर साथीला बसणार असून हा कार्यक्रम १४ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता मुंबईतल्या सायन येथे श्री. षण्मुखानंद हॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात रंगणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
भारतीय तरुणांची परफॉर्मिंग आर्ट्सच्या क्षेत्रातली कौशल्ये आजमावण्यासाठी षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभेतर्फे दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी हिंदुस्थानी शास्त्रीय संगिताला वाहिलेला एक कार्यक्रम एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात येत आहे. ‘सूरसागर’ असे या उपक्रमाचे नाव असून एप्रिल २०१७ ते २०१८ या कालावधीत हा कार्यक्रम साजरा करण्यात येईल. या मासिक मालिकेमध्ये गायन आणि वादन अशा दोन्ही प्रकारचे परफॉर्मन्सेस सादर केले जाणार आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या नियमानुरूप या कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश आहे.
संपर्क – sursagar.sabha@gmail.com
रमाकांत गायकवाड : भारतीय शास्त्रीय संगिताच्या क्षितीजावर नव्याने उगवणारा रमाकांत गायकवाड हा तरुण उदयोन्मुख तारा आहे. १३ मे १९८८ रोजी रमाकांत याचा जन्म झाला असून वयाचा चौथ्याच वर्षी त्याने आपले वडील पंडीत सुर्यकांत गायकवाड (संगीत अलंकार) आणि आई संगिता गायकवाड (संगीत विषारद) यांच्याकडे संगिताचे धडे घेण्यास सुरूवात केली. डॉ. सतीष कौशिक (किराणा घराण्याचे स्वर्गीय पंडीत सदाशिवराव जाधव यांचे शिष्य) हे त्याचे गुरू होते.
किराणा आणि पटियाला घराण्यातील संगिताचा अभ्यास करतानाच रमाकांत याने आपल्या वडिलांच्या हरी ओम संगीत कला मंच येथे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. केवळ सहाव्या वर्षीच रमाकांतने रंगमंच बहरून टाकण्यास सुरूवात केली. त्याच्यातली नैसर्गिक गुणवत्ता आणि त्याचा सांगितिक अभ्यास यामुळे सर्वसामान्य श्रोत्यांपासून संगीत क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींपर्यंत सर्वांकडून त्याला शाबासकीची थाप मिळत गेली. आज वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी रमाकांत याला अनेक पुरस्कार आणि शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत.