योजना देहानकर यांच्या रंगलेखनाचे प्रदर्शन सुरु
सुप्रसिध्द रंगलेखिका योजना देहानकर यांनी अलिकडच्या काळात साकर केलेल्या चित्रांचं ‘रस्टीक मेलडीज’ हे चित्रप्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये मांडण्यात येणार आहे. नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, डिस्कव्हरी ऑफ इंडीया बिल्डींग, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई या ठिकाणी हे प्रदर्शन १८ ऑक्टोबरपासून सुरु झाले असून ते २४ ऑक्टोबर पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार आहे.
कला म्हणजे जीवन जगण्याचा सुसंकृत मार्ग आहे. आपल्या कलेला जोपासताना चित्रकार योजना देहानकर यानी अनेक ठिकाणी फेरफटका मारला. काही ठिकाणी बसून प्रत्यक्ष निसर्ग चित्रण केलं, तर काही प्रेक्षणीय ठिकाणं त्यांच्या मनात कायमची घर करून राहिली. या ठिकाणांपैकीच एक ‘राजस्थान’.
सदर प्रदर्शनातही अनेक ठिकाणची चित्रं असली तरी जास्त कल राजस्थानकडेच आहे. निसर्गाची बुज आणि परंपरेचा ठेवा जपणारं राजस्थान चित्रकर्तीला जास्त भावलं. एकिकडे राजवैभवात नटलेले भव्य महाल, कोरीवकाम असलेली मंदीरं, उंच मनोरे तर दुसरीकडे रखरखीत वाळवंटात वावरणारें बंजारा लोक. कधी तिथल्या बागेत नाचणारा मोर मनाला भुरळ पाडतो तर कधी वाळवंटात अथक चालणारा उंट हृदयाचा ठाव घेतो. चित्रकर्तीने मनात साठवलेली ही अनमोल ठेव कुंचल्याच्या सहाय्याने चितारून रसिकांना पेश केली आहे आणि राजस्थानशी जुळलेलं नातं दृढ केलं आहे.
चित्रकार योजना देहानकर यांनी साकरलेली ही चित्रं पाहून राजस्थानच्या संकृतीचं दर्शन रसिकांनीही घ्यावं म्हणून हा स्तुत्य उपक्रम आहे. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या या चित्रकर्तीला बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडीया, प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशन, कॅमल आर्ट फाउंडेशन अशा नामांकीत संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत.