‘स्टार प्रवाह’वर बँक कर्मचा-यांचे भावविश्व
भारतातून काळ्या पैशाचा नायनाट करण्यासाठी केंद्रसरकारने उचललेल्या चलनबदलांच्या निर्णयावर संपूर्ण देशात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चलन बदलाची मोठी जबाबदारी पेलत असलेल्या बँकेतील कर्मचा-यांचे सध्याचे भावविश्व स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ग सहाजणी’ या मालिकेद्वारे लवकरच दिसणार असून, हे काम फत्ते करण्यासाठी सहा जणींनी पदर खोचला आहे.
देशातील आर्थिक व्यवस्थेला परिणाम करणा-या या नोटाबंदीला सर्वच बँकांना उत्तम प्रतिसाद दिला आहे; स्टार प्रवाहची मंजुळाबाई उसने परतफेड बँकदेखील त्याला अपवाद नाही. आपल्या कौटुंबिक समस्या बाजूला ठेवत या सहाजणी नागरिकांच्या सेवेसाठी अधिकतास बँकेत काम करणार आहेत. वास्तवातदेखील सर्वत्र हेच चित्र दिसून येत आहे.
आपले खाजगी आयुष्य बाजूला ठेवत बँकेतील सर्व कर्मचारी बँकेत येणा-या नागरिकांच्या गरजा पुरवत आहेत. ‘ग सहाजणी’च्या या विशेष भागात एक रंजक घटनादेखील रसिकांना पाहायला मिळणार आहे. बँकेच्या कामात भरपूर व्यस्त असलेल्या कामिनीच्या मुलीवर एक समस्या ओढावली आहे, मात्र कामिनीला तिच्याकडे जाता येत नाही. कामाच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे तिला तसे करणे शक्य होत नाही. शिवाय आपल्या स्टाफना सांभाळून घेणा-या ब्रँच मॅनेजर विद्या विसपुते मॅडमदेखील गैरहजर असल्यामुळे बँकेचा सारा कारभार धबडगावकरांकडे आला आहे. अशावेळी कामिनी काय करते? पाचजणी तिला कशी मदत करतात? धबडगावकर सहा जणींच्या बाजूने उभे राहतील का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
देशातील आर्थिक उलाढालीला कारणीभूत असलेल्या या चलनबदलामुळे कामाच्या पेचात अडकलेल्या कर्मचा-यांचे जीवन आणि त्यांची कर्तव्यदक्षता दाखवणारा ‘ग सहाजणी’ चा हा एपिसोड दि. २२ आणि २३ नोव्हेंबरला प्रेक्षकांना पाहता येईल.