सईशा फाउंडेशनचे संगीतमय सादरीकरण
सईशा फाउंडेशन मुंबई निर्मित व प्रस्तुत ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ४२ नवगीतांच्या धगधगत्या संगीतमय शिवचरित्राचा २५वा प्रयोग आणि ५ वर्षांचा वर्षपूर्ती सोहळा दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ ऑक्टोबरला रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे संपन्न झाला.

कार्यक्रमात सादर झालेल्या गीतांना काही ठिकाणी नृत्य आणि शस्त्रांचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. तसेच पारंपारिक गोधळ, छत्रपती शिवरायांनी स्वत्व जागृत केलेल्या मराठयांच्या विजय मालिकांचे, त्यांच्या सर्व साथीदारांच्या पराक्रमाचे, सईबाईंच्या भावनांचे गीतांमधून सादरीकरण झाले. गीतांचा प्रसंगानुरूप सादरीकरण, ऑडिओ – व्हिज्युअल तंत्राचा वापर आणि गीतांमधील प्रसंग नृत्य-नाट्य तसेच लढाईचे प्रसंग खुलवणे हे शिवरुद्राचे वैशिष्ट्य होते.
या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि वित्त आणि आयोजन व गृहमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर उपस्थित होते.

पद्मश्री राव यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. अनिल नलावडे ज्यांच्या लेखणीतून, गीत रचनेतून आणि संगीत दिग्दर्शनातून हा कार्यक्रम उलगडतो. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तिन्ही निवेदनातून छत्रपती शिवरायांचा इतिहास यात मांडला गेला.
या कार्यक्रमातील गीतांना महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निवेदन लाभले असून, निनादराव बेडेकर, तुकाराम जाधव, बाळ बेंडखळे, ऐतिहासिक शस्त्र संग्राहक गिरीश जाधव अशा अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे.
सईशा फाऊंडेशन मुंबई या संस्थेअंतर्गत सदर उपक्रम सादर केला गेला. सामाजिक हेतू आणि भक्कम राष्ट्रभक्तीतच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलताना या उपक्रमातून उभा राहिलेला निधी हा सामाजिक संस्थांसाठी, गरजू विद्यार्थ्यांसाठी, मराठी शाळांसाठी उपयोगात आणला गेला असल्याचे आयोजकांनी सांगितले.