‘सिरी सिद्धार्थ गौतम’ला बॉक्स ऑफीसवर उत्तम प्रतिसाद
पहिल्या आठवड्यात पाऊण कोटी
श्रीलंकेसह जगातील इतर बौद्धराष्ट्रांमध्ये तुफान गाजलेला ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रात पहिल्या आठवड्यात पाऊण कोटी कॅलेक्शन केले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष आणि साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून हा चित्रपट हिंदी भाषेत भारतामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रात प्रदर्शित केला गेला.
संपूर्ण मराठवाडा – विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जवळपास साठ चित्रपटगृहात एकशे ऐंशी शोज् सलग हाऊसफूल्ल देण्याचा एक वेगळा विक्रम या चित्रपटाने केला असल्याचा दावा या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेने केला आहे.
युवराज सिद्धार्थाचा भगवान गौतम बुद्ध होण्यापर्यंतचा एक भावनिक प्रवास या चित्रपटात उत्तमरित्या साकारल्याने प्रेक्षकांना त्याच्या तथागताचा त्याग आणि बलिदान पाहून साक्षात भगवान गौतमबुद्धाचे खरे दर्शन घडत आहे. त्यामुळे “मला माझा बुद्ध दिसला..तुम्ही पाहिला का?” अशा पद्धतीचे संदेश व्हॉट्ॲप वर महाराष्ट्रभर फिरत आहेत, असेही सांगितले जात आहे.
“जर तुम्ही डॉ. बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी असाल आणि बौद्ध असल्याचा तुम्हाला अभिमान असेल तर धम्माचा प्रसार करणं तुमचं कर्तव्य आहे. युवराज सिद्धार्थाने त्यांची पत्नी, नवजात बाळासह वैभवी जीवनाचा त्याग केला तो स्वत:साठी नव्हे तर तुमच्या आमच्या साठी. वैज्ञानिक दृष्टिकोनातून वर्तमानात माणूसकीच्या नात्याने जगण्याचा तथागत गौतमबुद्धांचा संदेश केवळ बौद्ध नव्हे तर आपण प्रत्येक भारतीयाने अंगिकारला पाहिजे, तरच आपला देश प्रगती करेल. तथागतांचा हा संदेश चित्रपटाच्या माध्यमातून जनतेला विशेष करून युवकांपर्यंत पोहोचावा म्हणून सिरी सिद्धार्थ गौतम हा चित्रपट भारतात पहिल्यांदा महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला आहे.” असे मत या चित्रपटात युवराज सिद्धार्थाची भूमिका साकारणारा अभिनेता गगन मलिक याने दिक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभात बोलताना व्यक्त केले. त्यामुळे लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भीमसैनिकांनी हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला आहे.
मागील सहासष्ठ वर्षांचा श्रीलंकेतील विक्रम मोडल्यानंतर हा चित्रपट चीन, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, कोरीया, थायलँड आणि आता भारतात टप्प्याने प्रदर्शित होत आहे. बॉलीवूड आणि हिंदी टीव्ही क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. रामायण तसेच संकटमोचन महाबली हनुमान या मालिकेत श्रीरामाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता गगन मलिक याने युवराज सिद्धार्थ गौतमाची भूमिका वठवली आहे. त्याच बरोबर बीग बॉस – सीझन 8 चा विजेता गौतम गुलाटी याने देवदत्त तसेच अभिनेत्री आँचल सिंह हिने यशोधरा तर अंशू मलिक या अभिनेत्रीने महामाया साकारली आहे. .
युनायटेड नेशनच्या जागतिक बुद्धीस्ट फिल्म फेस्टीवल मध्ये पाच इतर पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. 2013 या वर्षीच्या दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये तीन पुरस्कांनी गौरविण्यात आले आहे.