२४ ऑक्टोबरपर्यंत बघायला मिळणार रंगलेखन
प्रसिद्ध रंगलेखक सुरेंद्र (सुरेश) खोत यांनी अलीकडच्या काळात साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात १८ ऑक्टोबरपासून सुरु होत असून, ते २४ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
सुरेंद्र खोत यांनी १९६६ साली सर जे.जे. कला महाविद्यालयामधून कमर्शिअल आर्टचे शिक्षण घेतले. नावाजलेल्या जाहिरात कंपनीमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे अनेक जाहिरात कंपन्यांसाठी काम केले आहे. त्यानंतरच्या काळात जाहिरातींचे काम कमी करून त्यांनी पेंटिंग्समध्ये स्वतःला गुंतवून घेतले. पूर्वीपासून फोटोग्राफीची आवड असल्यामुळे त्यांना रंगलेखन करण्यास मदत झाली. ग्रामीण जीवन, वेगवेगळ्या प्रांतातील कलाकार , माणसे, निसर्ग, विक्रेते, पारंपरिक कलाकार हे सारे त्यांनी आपल्या कलाकृतींमध्ये चित्रबद्ध करावे म्हणून हा उपक्रम हाती घेतला. करपल्लवी कलाकार, गोंधळी वासुदेव तरंग, देवांचे मोरपिसाने सजवलेले मुखवटे अशा अनेक पारंपरिक कलाकृती नजरेआड होऊ लागल्या आहेत , या सर्वाना उजाळा देण्यासाठी ‘सुरंगी’ ( हे एका फुलाचे नाव सु-रंगी ) हे रंगलेखनाचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळाघोडा, मुंबई येथे मंगळवार दिनांक १८ ते दिनांक २४ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते सांयकाळी ७ या कालावधीत भरवले आहे.