स्वरयात्रा आणि भगवानदास पेराज फाऊंडेशनचा उपक्रम
स्वरयात्रा आणि भगवानदास पेराज फाऊंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘बडिंग स्टार्स’ या आगळ्यावेगळ्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द शास्त्रियगायिका सौम्या उल्लाल-कंटक यांचे गायन आणि देवस्मिता भट्टाचार्य यांचे सरोदवादन या मैफिलीत ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. शुक्रवार १० मार्चला सायंकाळी ५.३० वाजता ठाण्यातील घंटाळी येथील सहयोग मंदिरात या मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून ती विनाशुल्क आहे.
‘बडिंग स्टार्स’ या शीर्षकांतर्गत सादर होणाऱ्या या मैफिलीत तबला, संवादिनी, सरोदवादनासह शास्त्रीय गायनही होणार आहे. सौम्या यांना या मैफिलीत ऋग्वेद देशपांडे तबल्याची तर सुप्रिया मोडक संवादिनीची साथ देतील. सरोदवादक देवस्मिता भट्टाचार्य यांच्यासोबत स्वप्निल भिसे यांचे तबलावादन ऐकण्याची संधी संगीतप्रेमींना मिळणार आहे.
स्वरयात्राचे संचालक श्री. मनोज मंडलीकर म्हणाले की, “गेल्या पाच वर्षांपासून आम्ही स्वरयात्रेच्या माध्यमातून कलाकारांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत. यावर्षी निवडण्यात आलेला प्रत्येक कलाकाराची कला सादर करण्याची आपली एक वेगळी पध्दत आहे. जेव्हा हे सर्व कलाकार एकाच व्यासपीठावर एकत्र येतील तेव्हा त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जातील.”
ते पुढे म्हणाले की, “सभागृह सादरीकरण अर्थात निवडक रसिकांपुढे संगीत सादरीकरण कलाकार आणि रसिकांमध्ये चांगले बंध निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण ठरतात. भारतीय शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांपुढे वेगवेगळ्या कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणे आणि संगीत बैठकीच्या सादरीकरणातून जिवंत ठेवण्याची ही प्रक्रिया माझ्यासाठी खूपच समाधानकारक आहे.”
शुक्रवार १० मार्च २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ठाण्याच्या घंटाळी येथील सहयोग मंदिर सभागृहात ही मैफिल आयोजित करण्यात आली असून ती सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुली आहे.
कलाकारांची ओळख
सौम्या उल्लाल-कंटक
संगीतप्रेमी घराण्यात जन्मलेल्या सौम्या यांननी हिंदूस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण बंगळुरूच्या आर. लीलाबाई यांच्याकडून घेतले. त्या २००५ मध्ये मुंबईत आल्या आणि त्यांन सुधा वाटवे यांच्याकडे शास्त्रीयगायनाचे धडे सुरु ठेवले. याशिवाय त्यांना अपूर्वा गोखले आणि त्यांच्या आजी सुमन सवूर यांचेही मार्गदर्शन मिळाले. सौम्या यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून विशारद ही पदवी प्राप्त केली असून, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) विद्यापीठातून २००९ मध्ये संगीत या विषयात प्रथम श्रेणीत एमए पदवी मिळवली आहे. मानसशास्त्राच्या त्या पदवीधर असून समाजसेवा या विषयात त्यांनी निर्मला निकेतनमधून पदव्यूत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांना वेगवेगळ्या शास्त्रीय संगीतातील स्पर्धेत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी त्यांना सरकारकडून शिष्यवृत्तीही मिळाली आहे.
देवस्मिता भट्टाचार्य
देबास्मिता यांची सरोदवादनाशी ओळख वयाच्या ५व्या वर्षी वडिल पंडित देबाशिष भट्टाचार्य यांनी करुन दिली, त्यानंतर गुरु या नात्याने त्यांना प्रशिक्षण दिले. पं. देबाशिष हे “सेनिया शहाजहानपुर घराणा”चे पद्मभूषण पंडित बुध्ददेव दासगुप्ता यांचे सर्वात ज्येष्ठ शिष्य आहेत. त्यानंतर देबास्मिता यांननी १२ वर्षे पंडित बुध्ददेव दासगुप्ता यांच्याकडुन संगीत प्रशिक्षण घेतले. देबास्मिता आयटीसी संगीत संशोधन अकादमीमधल्या ‘अ’ दर्जाच्या शिष्य असून त्यांनी रवीन्द्र भारती विद्यापीठातून संगीत या विषयात पदव्यूत्तर अभ्यासक्रमात सुवर्ण पदक पटकावले असुन सध्या तिथेच पीएचडीचा अभ्यास करत आहेत.
संपर्क – ९६९९९०३६९००