११ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
गेल्या वर्षभरात कुटुंबासोबत तरुणांनाही आवडेल अश्या उत्तम चित्रपटांची मराठीत निर्मिती होत आहे. ‘लॅन्डमार्क फिल्मस’ ही चित्रपट निर्मिती करणारी कंपनी असाच एक दमदार आणि चवदार चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे , ज्याचे नाव आहे ‘वजनदार’. ११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर्शित होईल.
‘वजनदार’ या चित्रपटाला एक नसून दोन नायिका आहेत. त्या आहेत मराठीतील आजच्या सर्वात आघाडीच्या आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट. याशिवाय चित्रपटात चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर एका महत्वाच्या भूमिकेत आहे.
सचिन कुंडलकर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे व दिग्दर्शन केलं आहे. सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासारखे वजनदार फॅन फॉलोईंग असलेले कलाकार या चित्रपटात आहेत. त्याशिवाय समीर धर्माधिकारीसारखा अनुभवी कलाकार व माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा सुपुत्र चिराग पाटील या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करतो आहे. चेतन चिटणीस हा नव्या दमाचा कलाकारही या चित्रपटात आहेत. त्यामुळे आशयविषयासह खुसखुशीत मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवता येईल.
‘सांगतो ऐका… !’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर ‘लॅन्डमार्क फिल्मस’च्या विधि कासलीवाल आता पुन्हा एकदा नवा विषय घेऊन येत आहेत. विधि कासलीवालयांना चित्रपटसृष्टीची मोठी पार्श्वभूमी आहे. बडजात्या कुटुंबाशी त्या संबंधित आहेत. राजश्री फिल्म्सच्या ‘विवाह’या चित्रपटासाठी त्या सहायक दिग्दर्शक होत्या. तसंच ‘इसी लाईफ में’ या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. वेगळ्या विषयांच्या शोधात त्यांनी ‘सांगतो ऐका….!’ या धमाल चित्रपटाची निर्मिती केली होती. आता ‘वजनदार’ माणसांची ‘वजनदार’ गोष्ट त्या सादर करत आहेत. गेलं वर्षभर ‘वजनदार’ हा चित्रपट चर्चेत आहे. सोशल मीडियातही त्याविषयी उत्सुकता आहे.