व्हीईएसआयटी विद्यार्थ्यांचा उपक्रम
व्हीईएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी, चेंबूर (व्हीईएसआयटी) येथील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टीमने (सॉर्ट), चेंबूरमधील बँकांमधून नोटा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी मदतीचा हात देऊ केला आहे.
काळ्या पैशांमध्ये घट करण्यासाठी अंदाजे पन्नास विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने प्रयत्न केले. व्हीईएसआयटीमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी चेंबूरमधील विविध बँकांमधून जुना नोटा बदलण्यासाठी आणि एटीएममधून नव्या नोटा काढून घेण्यासाठी लांब रांगांमध्ये अनेक तास उभ्या असलेल्या लोकांना स्वतःहून मदत केली.
जुन्या नोटा बदलण्यासाठी अर्ज भरण्यासाठी सहकार्य हव्या असलेल्या वयस्क लोकांची त्यांनी विशेष काळजी घेतली. त्यांनी पाणी, प्रथमोपचार, शुगर टॉफी यांचे वाटप केले आणि नोटा बदलून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना व इतरांनाही सर्व प्रकारची मदत केली.
“रांगेमध्ये उभ्या असलेल्या बहुतांश व्यक्ती मध्यम वर्गातील आणि अल्प उत्पन्न गटातील होत्या. तळपत्या सूर्याखाली दिवसभर त्यांना रांगेत उभे राहिलेले पाहून त्रास होत होता. त्यामुळे आम्ही काळा पैसा कमी करण्यासाठी सरकारला मदत करायचे ठरवले,” असे व्हीईएसआयटीमधील सॉर्टचे सचिव कौस्तुभ ढाके यांनी सांगितले.
“मला आमच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. या उपक्रमातून त्यांनी समाजाची सेवा करताना, अनुभूती आणि नैतिक कर्तव्य यांची जाणीव दर्शवली आहे. अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी हे मॉडेल म्हणून वापरले जावे. विद्यार्थ्यांच्या या कृतीचे नक्कीच कौतुक करायला हवे,” असे व्हीईएसआयटीच्या प्राचार्य डॉ. जे. एम. नायर यांनी सांगितले.