तरुणाईचे भावविश्व मांडणारा नवा चित्रपट
‘मुद्रा एंटरटेनमेंट प्रा. लि.’ अंतर्गत लवकरच ‘वळण’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असून, गोरेगाव येथील एम् स्क्वेअर स्टुडिओमध्ये गीत ध्वनीमुद्रणाने या चित्रपटाचा ‘वळण’दार मुहूर्त पार पडला आहे.
या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते सुमन पटेल आणि अनिल दुबे, दिग्दर्शक शिवा त्रिपाठी, संगीतकार नितीन हिवरकर, गीतकार प्रकाश राणे, कलाकार ऋतुराज फडके, सहदिग्दर्शक प्रशांत विलणकर, कार्यकारी निर्माता शेखर नागवेकर तसेच चित्रपटातील तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.
यावेळी गायिका जान्हवी प्रभू अरोरा यांच्या आवाजात ‘बोले अंबे, बोल आता…’ हे गीत रेकॉर्ड करण्यात आलं. गीतकार प्रकाश राणे यांनी या गीताचे बोल लिहिले असून, संगीतकार नितीन हिवरकर यांनी संगीत दिलं आहे. ‘वळण’ या शीर्षकावरून चित्रपटामध्ये काय दडलं असणार याचा अंदाज बांधणं तसं कठीण आहे. कारण वळण हा बऱ्याच ठिकाणी फिट बसणारा शब्द आहे, त्यामुळे या चित्रपटात नेमकी कोणत्या वळणावरील कथा पाहायला मिळणार ते गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
चित्रपटाची कथा महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांच्या भावविश्वावर आधारित आहे. महाविद्यालयीन जीवन मुलांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतं. या वळणावर घडणाऱ्या गोष्टी मुलांच आयुष्य जसं घडवू शकतात तसं बिघडवूही शकतात. या वळणावर त्यांना योग्य मार्गदर्शन लाभलं तर त्यांचं आयुष्य घडतं, त्यामुळेच या चित्रपटाच्या माध्यमातून एक विचार मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं मत निर्माते सुमन पटेल आणि अनिल दुबे यांनी व्यक्त केलं आहे.
आजवर बऱ्याच चित्रपटांमधून केवळ महाविद्यालयीन जीवनातील प्रेम प्रकरण दाखविण्यात आलीआहे; पण‘ वळणचे कथानक या सर्वांपेक्षा वेगळे असल्याचं दिग्दर्शक शिवा त्रिपाठी यांचं म्हणणं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना तरूणाईच्या जीवनातील आजवर कधीही प्रकाश झोतात न आलेले पैलू पाहायला मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिवा त्रिपाठी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘वळण’ची कथा, पटकथा आणि संवाद संजीव रजत यांनी लिहिली आहेत. मोहन जोशी, वर्षा ऊसगांवकर, ऋतुराज फडके, पंकज विष्णू, जैमिनी, राज कनोजिया आदी कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.
केमेरामन एस. कुमार भगत या चित्रपटाचं छायालेखन करणार असून प्रशांत विलणकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत. मयंक श्रीवास्तव या चित्रपटाचे कोरिओग्राफर असून, महेंद्र राऊत कलादिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. पूजा त्रिपाठी वेशभूषा करणार असून शेखर नागवेकर कार्यकारी निर्माते आहेत. मुहूर्तानंतर लगेचच‘ वळण’च्या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे.