शरीरसौष्ठवपटूलाही मिळाला सन्मान
प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू आणि नवोदित अभिनेता अनुप सिंग ठाकूर हे पहिलेच शरीरसौष्ठवपटू आहेत ज्यांचा प्रतिकात्मक पुतळा लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये ठेवला जाणार आहे.
गोरेगाव येथील वेस्टीन हॉटेलमध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. या प्रसंगी एजाज खान, मृण्मयी देशपांडे, लीना मोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनुप सिंग नेहमीच त्यांच्या वेगळेपणामुळे चर्चेत असतात. एकाच वर्षातील शरिरसौष्ठव क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला लोणावळा येथील वॅक्स म्युझियममधे स्थान मिळाले आहे. सेलिब्रिटीज वॅक्स म्युझियमच्या सुनील कंडलूर यांनी हा पुतळा तयार केला आहे. याआधी क्रिकेटपटू कपिल देव यांचा पुतळा या म्युझियममध्ये ठेवला गेला आहे.
मिस्टर वर्ल्ड २०१५ मुळे ओळखले जाणारे अनुप आता अभिनय क्षेत्रातही पदार्पण करत आहेत. ते एकाच वेळी पाच भाषांमधील चित्रपटात प्रथम पदार्पण करत आहेत. तेलगू, कन्नड, तामिळ, मराठी आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये एकाच वेळी काम करत आहेत. चित्रपटात काम करत असतानाच अनुप यांनी सातव्या जागतिक शरिरसौष्ठव चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले. याचबरोबर ४९ व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक आणि फिट फॅक्टरमध्ये रौप्य पदक पटकावले होते.