मनोरंजनातून प्रबोधन करणारा एकपात्री कार्यक्रम
हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा मनोरंजनातून प्रबोधन करणारा ‘याल तर हसाल’ हा एकपात्री कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुफान लोकप्रिय होत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे ६४१ प्रयोग झाले असून ६४२ वा प्रयोग सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता गडकरी रंगायतन येथे होत आहे.
लवकरच १००० प्रयोगाचे लक्ष्य गाठण्याचा निर्मात्यांचा मानस असलेल्या या कलाकृतीचा ६४३ वा प्रयोग बुधवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता शिवाजी मंदीर, दादर येथे संपन्न होत आहे.
संजीवन मार्ग निर्मित, निर्माते शेखर म्हात्रे यांनी ‘याल तर हसाल’ या कार्यक्रमाची निर्मिती केली असून लेखन आणि सादरीकरण अर्थातच संजीवन म्हात्रे यांचे आहे. हया कार्यक्रमाचे सुत्रधार शिरीष अहिरे हे आहेत.
संजीवन म्हात्रे यांचा “याल तर हसाल” हा प्रत्येकाला हसत हसत अंतर्मुख करायला लावणारा तसेच आगरी भाषेला एका विशिष्ट उंचीवर नेवून ठेवणारा प्रयोग आहे. ज्यांना आगरी भाषा चटकन लक्षात येत नाही त्यांनाही हा प्रयोग सहज समजतो हे त्यांच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ‘याल तर हसाल’ या प्रयोगातून समाजप्रबोधनाबरोबरच एक चांगली करमणूक होते. अडीच तास गायन, अभिनय आणि वक्तृत्व याचे सहजसुंदर दर्शन या प्रयोगात घडते. यातील विनोद, कविता आणि त्याच्या सादरीकरणाला एकूणच लोककलेचा, लोकसंस्कृतीचा वारसा आहे. या कलाकृतीतील गाणी ही ठेका धरायला लावणारी असून आगरी ग्रामीण बोलीतून या मर्मभेदी काव्यरचना तेवढ्याच विनोदी ढंगात सादर केल्या आहेत.