९ जूनपासून चित्रपगृहांत येणार
डिसेंबर २०१४ मध्ये वर्तमानपत्रात एक बातमी आली होती. कुमारी मातांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारी. ती वाचून एक व्यक्ती प्रचंड अस्वस्थ झाला आणि त्याने यावर सिनेमा केला. त्या लेखक दिग्दर्शकाचे नाव आहे राजू मेश्राम आणि सिनेमा आहे झरी.
यापूर्वी त्यांच्या आलेल्या ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या सिनेमातून वास्तवाचे निखारे त्यांनी चितारले होते. ‘झरी’च्या विषयाचे अनेक पदर उलगडण्यासाठी त्यांनी चंद्रपूर आणि यवतमाळच्या जंगलात जाऊन तिथे राहणाऱ्या लोकांचे जीवनमान समजावून घेऊन ‘झरी’ सिनेमाची कथा गुंफली. यासाठी त्यांना अकोल्याचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी निर्माता आणि अभिनेता म्हणून मोलाची साथ दिली. सिनेमात ‘झरी’ची शीर्षक भूमिका नम्रता गायकवाड हीने साकारली आहे. तर निशा परुळेकर, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, अनिकेत केळकर, तुकाराम बिडकर, अनंत जोग, कमलेश सावंत, डॉ. संदीप पाटील, विजय दिवे, रवी उचगांवकर, अशोक शिरोळे यांच्या विशेष भूमिका आहेत.
आपण आज सर्व इंटरनेट ४जीच्या युगात आहोत, परंतु एक महाराष्ट्र असादेखील आहे जिथे त्यांना एकवेळ खाण्यासाठीदेखील युध्द करावे लागते. त्या एकवेळच्या जेवणासाठी जीवनाची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. ‘झरी’ सिनेमा अशा अनेक गोष्टींना दाखवत त्यांच्या सामाजिक, भावनिक आयुष्याचा वेध घेतो. तिथले सामान्य जनजीवन आणि नक्षलवाद यांचा सहसंबंध लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी दाखवला आहे.
सिनेमाचे कथानक हे ‘झरी’ या पात्राभोवती गुंफण्यात आले आहे. झरी ही एका कुमारी माताची प्रेम गाथा आहे. सिनेमाला प्रविण कुवर यांचे संगीत लाभले असून हा सिनेमा ९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. राधा बिडकर आणि कुंदन ढाके यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
चित्रपटात वऱ्हाडी, तेलुगू आणि छत्तीसगढी अशा तीन भाषांचा संगम पाहायला मिळणार आहे. चित्रपटाला इंग्रजी उपशीर्षकेही देण्यात येणार आहेत. चित्रपटात पाहायला मिळणाऱ्या या तीन भाषांसाठी त्या त्या भाषेतील तज्ज्ञ मंडळींची मदत घेण्यात आली आहे. चित्रपटात वेगवेगळ्या राज्यांतून आलेली माणसे आणि त्यांचे संवाद दाखविण्यात आले असून ती माणसे त्यांच्याच भाषेत बोलताना दिसावी, म्हणून हा प्रयोग करण्यात आल्याचे लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी सांगितले.