३१ जानेवारीपासून जहांगीर कलादालनात प्रदर्शन
देशाच्या विविध भागातून सहभागी झालेल्या समकालीन रंगलेखक आणि शिल्पकारांच्या कलाकृतींचे समूह प्रदर्शन मुंबईतील जगप्रसिद्ध जहांगीर कला दालनात ३१ जानेवारीपासून सुरु होत आहे. ‘संगम’ शीर्षकांतर्गतचे हे प्रदर्शन ६ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार असून ते कलारसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत निःशुल्क बघता येईल.
झेनिथ आर्टच्या वतीने हा अनोखा संगम घडवून आणला असून, पूनम मलिक या उपक्रमाच्या समन्वयक आहेत. ‘संगम’ जीवनाच्या सर्वस्पर्शी कलाविश्वाचा फेरफटका या प्रदर्शनातून बघायला मिळणार आहे. प्रदर्शनातील चित्र-शिल्पांचाच हा संगम नसून वेगवेगळ्या रंगमाध्यमांचा, शैलींचाही हा एक देखणा संगम या कलाकृतींच्या निमित्ताने कलाकारांनी साकारला आहे.
या प्रदर्शनात अनिल नाईक, अनिल गायकवाड, अमित, राजिंदर पाटील, सुरेंद्र जगताप, गणपत भडके,रमेश थोरात, पंडित खैरनार, मानसी पळशीकर, सुहास बहुळकर, डी. एस. राणे, मुरली लाहोटी, एम. सूर्यमूर्ती, तपन दास, तुका जाधव, आर. बी. पाटील, विनोद शर्मा, पूनम मलिक, असित पटनायक, निरेन सेन गुप्ता, उदय सिंग, पंडित खैरनार, जय झरोटिया, राजेंद्र प्रसाद, साबिया, हेमराज, असुरवेद, सुरेश कुमार, प्रमोद कुर्लेकर, सचिन सागरे, नीलेश वेदे, संदेश खुळे आणि विमल चंद या समकालीन कलाकारांच्या कलाकृतींनी हा संगम साकारला आहे.
या ‘संगम’च्या माध्यमातून कलेचे एक जंक्शन ३१ जानेवारीपासून सुरु होत असून, त्यात वेगवेगळ्या कलाकारांचे विविध फॉर्म, रंग, पोत, माध्यम आणि विषय याचे वैविध्य कलारसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
झेनिथ आर्टच्या पूनम मलिक यांनी हा ‘संगम’ घडवून आणला असून, जीवनाच्या सर्वस्पर्शी कलाविश्वाचा फेरफटका या प्रदर्शनातून बघायला मिळणार आहे.