मिलिंद गवळी यांचे दिग्दर्शनात पदार्पण
प्रत्येक कलावंत जेव्हा आपला मार्ग बदलून काही तरी वेगळ करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो स्वत:लाही चाचपडून पाहत असतो. गेली वीस-पंचवीस वर्षे बाल अभिनेता ते नायक अशी उज्वल कारकीर्द घडविल्यानंतर मिलिंद गवळी दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. त्याच्या या चित्रपटात वुमन पावर दिसणार आहे.

स्त्रीशक्ती आणि त्यांचे अथांग प्रेम व्यक्त करण्यासठी अभिनेत्री तन्वी हेगडे, स्मिता शेवाळे, पूजा नायक, मौसमी मौसमी हडकर, शीतल गायकवाड, करिष्मा पाताडे(बाल कलाकार), वंदना मराठे, सुझ्यान बर्नेट ह्या अभिनेत्रींच्या अवतीभवती कथानकाची गुंफण करण्यात आली असून मिलिंद गवळी हा चित्रपट घेऊन येत्या २९ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
मिलिंदने १९८४ साली चित्रित झालेल्या हम बच्चे हिंदुस्थान के या चित्रपटात बाल कलाकार म्हणून करियरला सुरुवात केली. त्यांनतर गोविंद सरैया यांच्या वक्त से पहले, बी आर इशारा यांच्या अनुमती, प्रदीप मैनी यांच्या वर्तमान या चित्रपटातून काम केले. मात्र कॅम्पस या हिंदी मालिकेने त्याला खऱ्या अर्थानं घराघरात पोहचविल. ह्या मालिकेनंतर मिलिंदच्या करियरला कलाटणी मिळाली. तरुणाईत तो प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्याकडे कामाची लाईनच लागली. मिलिंदला चांगले चांगले रोल ऑफर होऊ लागले. या संधीचा पुरेपूर फायदा उचलत परिवर्तन, मानो या न मानो, आहट, ममता, जॉबाज, सात फेरे, तहकिकात, डाकघर अपना घर, सीआयडी, करम, कुछ खोना हैं कुछ पाना हैं, इतिहास बंधन, कॅप्टन हाउस, अलंकार, रात, अभिलाषा, खुशबू , अक्सर, अर्पण इत्यादी हिंदी मालिकांची निवड करून त्याने संपूर्ण भारतात लोकप्रियता मिळविली. या सोबत मोजक्याच पण दर्जेदार मालिकांमध्ये मिलिंदने भूमिका करून मराठी प्रेक्षकांनाही आपलेसे केले. तिसरा डोळा, गहिरे पाणी, अथांग, उन पाऊस, दुहेरी अश्या काही मालिका मिलिंदने मराठी रसिकांसाठी करून हिंदी सोबत मराठी प्रेक्षकांशीही आपली नाळ जोडली. मालिकांतून आपले करियर बहरत असताना मिलिंद रुपेरी पडद्याला विसरला नाही. त्याने मालिकांसोबतच मराठी चित्रपटांनाही प्राधान्य देत काहीश्या वेगळ्या भूमिकांची निवड केली.

व्ही के नाईक यांच्या हे खेळ नशिबाचे, सून लाडकी सासरची, सतीश रणदिवेंचा निलांबरी, महेश मांजरेकरांचा आई, तसेच प्रियदर्शन सोबत आर्यन या मल्याळी चित्रपटातही प्रमुख भूमिका केल्या आहेत. तसेच मराठा बटालियन,असंच पाहिजे नवं नवं, देवकी, विठ्ठल विठ्ठल या चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिका विशेष गाजल्या. सख्खा भाऊ पक्का वैरी या तुफान हिट चित्रपटामुळे तो पश्चिम महाराष्ट्रात सर्वांचा लाडका झाला. महिमा खंडोबाचा ते सासर माझे मंदिर अश्या जवळपास ३५ – ४० ग्रामीण चित्रपटांमध्ये नायक म्हणून काम करून तो ग्रामीण सिनेमाचा खऱ्या अर्थाने नायक झाला. पण अशी होती संत सखू, हौसेने केला पती, पालखी, आई तुझा आशीर्वाद, भक्ती हीच खरी शक्ती, सासर माझे मंदिर, सासूचा घरात, कारल्याची एकविरा, माहेरची माया, हिरवा चुडा, हळद तुझी कुंकू माझा इत्यादी महिलांचे भावविश्व, त्यांच्या प्रेम, संसाराची गाथा कथन करणाऱ्या या चित्रपटांमुळे मिलिंदचा नवा चाहता वर्ग तयार होऊन महिलांमध्ये त्याची विशेष पहचान झाली. तो त्यांना आपला भाऊ, मुलगा, दीर अश्या विविध रुपात आवडत राहिला आहे. गावाकडील सरळ सध्या मनाच्या आई बहिणी त्याच्यावर विशेष माया करतात. शहरी प्रेक्षकांसाठी मिलिंदने शूर आम्ही सरदार, आम्ही का तिसरे, दुर्गा म्हणत्यात मला, चिंगी, सोबती, आंदोलन, ठण ठण गोपाळ, धनगर वाडा इत्यादी चित्रपट करून आपल्यातला कलावंत किती वेगळा आहे हे दाखून दिले आहे. मिलिंदने आपली पहिली कलाकृती दिग्दर्शित करताना शहरी आणि महिला प्रेक्षकांच्या आवडीचा मेळ घालणारी कथा निवडून ती वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व कलावंत तंत्रज्ञांनी ही कलाकृती अधिक सकस बनविण्याची तितकीच मोलाची साथ त्याला दिली आहे.