नागपूरचे ‘कमेला’ द्वितीय; वाशीचे ‘सारी रात’ तृतीय
गेल्या वर्षी ५३व्या मराठी हौशी राज्य नाटय़ स्पर्धेत प्रथम पुरस्कार पटकावणा-या चंद्रपूरच्या नवोदिताच्या ‘चिंधीबाजार’ने यावर्षी नाशिकमध्ये झालेल्या ५४ व्या महाराष्ट्र हिंदी नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रथम पारितोषिक पटकावले आहे. या स्पर्धेत नागपूरच्या बोधी फाऊंडेशनच्या ‘कमेला’ला द्वितीय तर वाशीच्या ‘टाऊन लायब्ररी’च्या ‘सारी रात’ला तीय क्रमांक पटकावला.
१० ते ३१ जानेवारी दरम्यान नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाटय़गृहात झालेल्या या स्पर्धेत एकूण ३३ नाटय़प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रभाकर दुपारे, श्रीराम जोग, रमेश थोरात यांनी काम पाहिले.
वैयक्तिक पुरस्कारांमध्ये नाटय़लेखनाचे प्रथम पारितोषिक भगवान हिरे (बदलती करवटे) यांना तर द्वितीय सलिम शेख (कमेला) यांना जाहीर झाले आहे.
दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार जयश्री कापसे गावंडे (चिंधी बाजार), द्वितीय सलिम शेख (कमेला) यांनी पटकावला आहे. तांत्रिक पुरस्कारांमध्ये नेपथ्याचा प्रथम विवेक भगत (सारी रात), द्वितीय सतीश सांडभोर (हिजडा), प्रकाशयोजना : प्रथम मिथुन मिश्र (चिंधी बाजार), द्वितीय सुनील मेस्त्री (सारी रात), रंगभूषा : प्रथम माणिक कानडे (चिंधी बाजार), द्वितीय नलिनी बनसोड (कमेला) यांना जाहीर झाले आहेत.
उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक हेमंत पाटील (दास्ताँ), जयेंद्र बगाडे (कोर्ट मार्शल), वैशाली पाटील (सारी रात), रोहिणी उईके (चिंधीबाजार) यांनी पटकावली आहेत.अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे संपदा सोनटक्के (दिल धुंडता है), पूजा पिंपळकर (कमेला), पूजा वेदविख्यात (बदलती करवटे), डॉ. मनू मेनन (आओ तनिक प्यार करे), नुतन धवने (चिंधी बाजार), मयूर शितोळे (हिजडा), विनोद राऊत (कमेला), सुभाष लोखंडे (जानेमन), अक्षय जोशी (ना जाने क्यों), धनंजय धनगर (चिंधीबाजार) यांनी पटकावल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळवले आहे.