सुप्रसिद्ध चित्रकार मधुमिता भट्टाचार्य यांचे ‘फिलिंग्ज ऑफ सेरेनिटी’ हे एकल चित्रप्रदर्शन कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, बजाज भवन, जमनालाल बजाज मार्ग, २२६ नरिमन पॉईंट, मुंबई येथे ९ ते १४ फेब्रुवारीदरम्यान भरणार असून, ते सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना पाहाता येणार आहे.
कलेची आराधना म्हणजेच परमेश्वराची पूजा असे मानणा-या मधुमिता भट्टाचार्य या स्वयंसिद्ध चित्रकार आहेत. या कलेनेच त्यांना जीवनाचा आनंद दिला आणि त्याला अर्थ प्राप्त झाला. कला आणि अध्यात्म यांचा संगम झाला आणि आपल्या हातून चित्रनिर्मिती झाली आणि जीवनात आनंद, शांती आणि प्रसन्नता अवरतली असं त्या म्हणतात. ‘बुद्ध’ चित्रीत करताना ही कला आपसूकच अवगत होत गेली, असा मधूमिता भट्टाचार्य यांचा अनुभव आहे. मधुमिता भट्टाचार्य यांना लहानपणी भरपूर फिरायला मिळालं. सिक्कीम, भुतान, नेपाळ, दार्जिलिंग, धरमशाळा, योल, डेहराडून अशा ठिकाणी भ्रमंती करताना अनेक बुद्ध गुंफांमधून बुद्ध प्रतिमांचे दर्शन झाले आणि बुद्ध त्यांच्या अतंर्मनात घर करू लागला. त्या अंतर्मनात असलेल्या बुद्ध प्रतिमा त्यांनी कॅनव्हॉसवर मांडल्या आहेत.
या छायाचित्र प्रदर्शनात बुद्धाची प्रसन्नचित्त, ध्यानस्त आणि अध्यात्मिक रूपं चित्ररसिकांना पहायला मिळतील. पूर्तता आणि मोक्ष यांचं साधन असलेल्या या बुद्धप्रतिमा पाहताना आपल्याला मन:शांती आणि समाधान मिळेल, यात शंकाच नाही.
