प्रयोगशील नाट्यसंस्था ‘अस्तित्व’तर्फे निर्मित मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच घडणारा दीर्घांकाचा सिक्वेल ‘दोन बाकी एकाकी’ आणि विजया राजाध्यक्ष यांच्या विशेषत्वाने वाचकप्रिय ठरलेल्या ‘पै-पैशाची गोष्ट’ या कथेवरचे एकपात्री नाटक हे यंदाच्या प्रतिष्ठेच्या काळाघोडा महोत्सवातले दोन महत्वाचे मराठी नाट्य प्रयोग आहेत.
झी टीव्हीच्या ‘जिंदगी’ वाहिनीच्या सहकार्याने होणा-या ‘जिंदगी जोडे दिलोंको’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘दोन बाकी….एकाकी’ला स्थान मिळाले आहे. आंतरमहाविद्यालयीन रंगभूमीवर भव्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या पारितोषिक विजेत्या चार महाविद्यालयांच्या संघाकडून मोजक्या- नेपथ्य प्रकाश योजनेचा आधार घेत सादर केलेला ‘एक बाकी….एकाकी’ हा दीर्घांक विशेष गाजला होता, याच दीर्घांकाचा दुसरा भाग अर्थात सिक्वेल ‘दोन बाकी एकाकी’ या महोत्सवात सादर होणार आहे.
शहरी जीवनाच्या गजबजाटात, माणसांच्या गर्दीत असूनही एकटेपणात गढलेले, आपल्या सभोवतालचेच व्यक्तिविशेष सादर करून चकित करणा-या ‘एक बाकी…..एकाकी’नंतर सजीव आणि निर्जीव वस्तूंच्या सहचर्यातून एकटेपणा घालवू पाहणा-या जीवांची चक्रावून टाकणारी कथा लेखकाने ‘दोन बाकी….एकाकी’ या दीर्घांकात मांडली आहे. ‘एक बाकी…..’प्रमाणे याही दीर्घांकात रुईया, इस्माईल युसुफ, सीएचएम, एसएनडीटी, ठाकूर आणि रुपारेल अश्या विविध महाविद्यालयातल्या नाट्य गुणवत्तेला एकत्र आणण्यात आले आहे. संकेत तांडेल लिखित संकेत आणि संजय जामखंडी दिग्दर्शित या दीर्घांकात अभिजित पवार, तुषार घाडीगावकर, श्रुती कांबळे, सायली परब, राजरत्न भोजने, वैभव पिसाट, भावेश टिटवाळकर, सुवेधा देसाई आणि गौरव मोरे हे विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेले अभिनेते एकत्र काम करता आहेत. या दीर्घांकाचा शुभारंभ येत्या १३ फेब्रुवारीला रात्री आठ वाजता, नॅशनल गॅलरी ऑफ़ मॉर्डन आर्ट, सर कावसजी जहाँगीर पब्लिक हॉल, एम्.जी रोड, काळाघोडा इथे होईल.
नव्या गोष्टींची खंत न करता स्वीकारताना जुन्यात रमून राहणे आवडते अश्या आपल्या आई, आजी आणि आपण अर्थात पर्यायाने आपल्या आजूबाजूला घडणारी तीन पिढ्यांची गोष्ट सादर करणारी विजया राजाध्यक्ष यांच्या उत्तरार्ध या कथा संग्रहातील ‘पै-पैशाची गोष्ट’ विपुल महागावकर या युवा दिग्दर्शकाने नाट्यरुपांतरीत केली असून, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांनी मुख्य साकारली आहे. तालीम निर्मित – अस्तित्व प्रस्तुत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या ९ फेब्रुवारीला संध्याकाळी ६:३० वाजता काळाघोडा महोत्सवात गॅलरी बियाँड, फोर्ट इथे होणार आहे.
