कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के सवलत
मॅजिक अवर क्रियेशनच्या बॅनरखाली वैजयंती साबळे, शिवदर्शन साबळे आणि अपूर्वा मोतीवाले – सहाय निर्मित “परंपरा डॉट कॉम” हे नाटक रौप्य महोत्सवी प्रयोगाकडे वाटचाल करत आहे.
“परंपरा डॉट कॉम” हे अगदी आगळ्या वेगळ्या विषयावरील, एक सामाजिक संदेश देणारे विनोदी नाटक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असल्याचे सांगितले हात असून, लवकरच या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग सादर होणार आहे. परंपरा ही मोडण्यासाठीच असते आणि कालांतराने ती मोडली जाते असे मानणार्या आजच्या युवा पिढीवर हे नाटक बेतले असून, सध्याच्या पुनर्जीवित नाटकाच्या परंपरेतही हे नाटक प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात यशस्वी होत आहे. लेखक आणि दिग्दर्शक शिवदर्शन साबळे यांनी शाहीर साबळे यांची परंपरा कायम ठेवून आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारे तसेच तरुणाईशी संलग्न असणारे हे धमाल मनोरंजन करणारे विनोदी नाटक रंगभूमीवर आणले आहे. विशेष म्हणजे युवा वर्गांनी हे नाटक आवर्जून पहावे या उद्देशाने कॉलेजच्या विद्यार्थ्यासाठी तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे.
‘फु बाई फू” मुळे घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता अतुल तोडणकर यांचा अप्रतिम अभिनय आणि देवदत्त साबळे यांचे सदाबहार संगीत हे या नाटकाचं वैशिष्ट्य असून मुग्धा कर्णिक, मिलिंद उके, आशय कांबळी आणि रुचिता शेलार यांचा अभिनय ही या नाटकाची जमेची बाजू आहे. मराठी चित्रपट क्षेत्रातील यशस्वी संकलक अपूर्वा मोतीवाले – सहाय हिने या नाटकाद्वारे निर्माती म्हणून रंगभूमीवर पाऊल टाकले आहे.
“परंपरा डॉट कॉम” या पहिल्याच नाटकाच्या यशानंतर मॅजिक अवर क्रियेशनच्या बॅनरखाली लवकरच एक रोमॅंटिक कॉमेडी नाटक येत असून त्याचं लेखन शिवदर्शन साबळे व तेजस्विनी लेले यांनी केले आहे. या नाटकाचं दिग्दर्शन शिवदर्शन साबळे करणार असून संगीत देवदत्त साबळे व शिवदर्शन साबळे देणार आहेत. नेपथ्य विजय कोलवणकर, वेशभूषा सचिन लोवलेकर, रंगभूषा शरद सावंत तर भूषण देसाई हे प्रकाश योजनेची जबाबदारी पार पाडणार आहेत.
या नाटकात एकूण पाच गाणी असणार आहेत. त्यातील एका गाण्याची गंमत म्हणजे या विशेष गाण्याची निर्मिती तब्बल ४५ वर्षाआधी झाली होती. संगीतकार देवदत्त साबळे यांच्या आयुष्यातील ही त्यांची पहिली चाल आहे. नाटकाचे नाव मात्र अद्याप ठरलेलं नाही. पण संपूर्ण पडद्यामागची टीम मात्र “परंपरा डॉट कॉम” ची असणार आहे. या नवीन कलाकृतीचा ट्रीझर लवकरच आपल्याला फेसबूक, ट्विटर, यूट्यूब व अन्य सोशल नेटवर्किंग साईटवर पहायला मिळणार आहे.